न्याय हाच संविधानाचा सर्वात मोठा संदेश : जयदेव डोळे

महावितरणमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी

औरंगाबाद ,१४ एप्रिल  /प्रतिनिधी :-भारतीय संविधानाची पोच तळागाळात आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी सामान्य माणूसही न्यायालयात जाण्याची भाषा करतो. संविधानाचे सर्वांत मोठे मूल्य न्याय आहे. तोच संविधानाचा सर्वात मोठा संदेश आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी केले.

          महावितरणच्या परिमंडल कार्यालयात गुरुवारी (14 एप्रिल) छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित डॉ.आंबेडकरांच्या 131 व्या जयंती उत्सवात ‘संविधानाचा संदेश’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता भुजंग खंदारे होते. मंचावर अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, कार्यकारी प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, प्रवीण दांडगे, समितीचे सचिव विनय घनबहादूर होते.

          यावेळी डोळे म्हणाले की, संविधान हवेसारखे आहे. ते दिसत नाही पण जाणवत राहते. विविध विचारांच्या, विविध पार्श्वभूमीच्या लोकांनी भारताचे संविधान निर्मिल्याचे जगभर कौतुक होते. डॉ.आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी संविधान सर्वसमावेशक केले. एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य हे तत्त्व संविधानात आहे. जात-धर्म नव्हे तर व्यक्ती मोठी आहे. तरीही संविधान व्यक्तीवादी नाही, ते समाजवादी आहे. हे त्याचे छुपे वैशिष्‌ट्य आहे. देशापेक्षा विचारधारा मोठी झाली तर आपण स्वातंत्र्य गमावून बसू, असा इशारा आंबेडकरांनी दिला होता. संविधानाने मागासवर्गीयांना दिलेल्या राजकीय आरक्षणास दर दहा वर्षांनी मुदतवाढ मिळते. शिक्षण व नोकऱ्यांतील आरक्षण तहहयात आहे. पण ते केवळ दहा वर्षे होते, असा अपप्रचार केला जातो.

संविधानाचा संदेश पूर्णपणे अमलात आणायचा असेल तर डॉ.आंबेडकरांचे संपूर्ण साहित्य वाचले पाहिजे. भारतात जात, धर्म, प्रदेशाची जाणीव प्रबळ आहे. प्रत्येकात संविधानात्मक जाणीव निर्माण झाली तरच आपण एकमेकांकडे स्वच्छ नजरेने पाहू शकू, असे डोळे म्हणाले.

          अध्यक्षीय भाषणात मुख्य अभियंता खंदारे म्हणाले की, शिवाजी महाराज, महात्मा फुले व शाहू महाराजांच्या जीवनकार्यातून बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली. त्यांनी आयुष्यभर वेगवेगळ्या पातळ्यांवर न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला. त्यातूनच त्यांना संविधान निर्मितीची जबाबदारी मिळाली आणि सर्वांना न्याय मिळेल असे संविधान त्यांनी तयार केले.

          कार्यक्रमात रमेश धोंडगे व संच तसेच महावितरण कर्मचाऱ्यांनी भीमगीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी आयोजित भीमगीत गायन व वक्‌तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. विनय घनबहादूर यांनी प्रास्ताविक तर रमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर आर्दड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विजय मेटे, प्रज्ञा गोपनारायण, संदीप बोर्डे, राजेश चांदणे यांच्यासह समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद शहरातील भडकल गेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.मयुर सोनवणे, कार्याध्यक्ष श्री.कय्युम शेख आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या वतीने भटकल गेट येथे बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिवादन केले. यावेळी माजी माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपशहर प्रमुख बाळू गडवे, रतनकुमार साबळे, बंटी जैस्वाल, हिरा बिरुटे, संतोष जाटवे, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.