सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई ,१३ एप्रिल /प्रतिनिधी :-  ‘सिल्वर ओक’ हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासात नवीन माहिती उघड झाल्याने सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. तर दुसरीकडे पोलीस तपासात नवीन माहिती काहीच नाही. तपास भरकवटला जातोय, असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली.

मुंबई पोलिसांच्या वतीने प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. घरत यांनी न्यायालयात आंदोलनासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोमधून पैसे गोळा केले, घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. अशा व्यवहारांचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती घरत यांनी कोर्टात दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सदावर्तेंना आता सातारा पोलीस घेणार ताब्यात

सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टानं मान्य केली असून सदावर्तेंना १७ एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्यास परवानगी दिली आहे. सदावर्ते यांनी साताऱ्यातील काही नेत्यांवर अवमानकारक विधानं केली होती. त्यामुळं त्यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चौकशीसाठी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे.