कर सुलभीकरण आणि कर कपात करून सामान्य करदात्यावरील कराचे ओझे कमी शक्य – केंद्रीय राजस्व सचीव तरुण बजाज यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय राजस्व सेवेतील 75 व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांच प्रशिक्षण सुरु

नागपूर,१३ एप्रिल  /प्रतिनिधी :-करदात्यांना आयकर कायद्यातील तरतुदींचा जाच न होऊ देता तसेच करसुलभीकरण तसेच काही करांमध्ये कपात करून आपण करदात्यावरील ओझे निश्चितच कमी करू शकतो असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या  राजस्व विभागाचे सचिव तरूण बजाज यांनी आज नागपूर येथे केलं. राष्ट्रीय प्रत्यक्ष कार अकादमी नागपूर येथे भारतीय राजस्‍व सेवेतील 75व्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते .  याप्रसंगी प्रत्यक्ष कर मंडळ – सीबीडीटीचे अध्यक्ष जे . बी . महापात्रा , सीबीडीटीच्या प्रशासन विभागाच्या सदस्या अनुजा सारंगी , एनएडीटी  अकादमीचे महासंचालक के.एम .  बाली प्रामुख्याने उपस्थित होते.

गरीब व  श्रीमंतांमधील दरी दूर करण्याकरिता कराचे अनुपालन होणे आवश्यक आहे. कर कमी झाल्यावर  कराचे अनुपालन वाढते तसेच करभरणाही वाढतो.  या करा मधील पैसा गरिबांच्या कल्याणकारी योजनावर खर्च होतो त्यामुळे राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका या कर संकलनात  महत्त्वाची असते असे तरुण बजाज यांनी सांगितले. कोवीड महामारीच्या काळात जेव्हा खाजगी गुंतवणूक ठप्प झाली होती त्यावेळी अर्थव्यवस्थेला सार्वजनिक अर्थव्यवस्थेनेच उभारी दिली. करसंकलनामूळे  वित्तीय तूट भरून काढता आली ,असे बजाज यांनी स्पष्ट केले. एनएडीटी मध्ये सर्व सुविधा युक्त वातावरण असून अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपला छंदही जोपासवा असे आवाहन बजाज यांनी केले .

सीबीडीटीचे अध्यक्ष महापात्रा यांनी  आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात विलीक्षण वाढ झाली असून भारतीय राजस्व अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट न बजावल्यास गरीबांकरिता असणाऱ्या या योजना , आराखडे यांच्या अंमलबजाणी वर विपरित परिणाम होऊ शकतो असे मत यावेळी व्यक्त केले. समन्यायी स्थिती प्रस्थापित करण्यात तसेच गरीबांना प्रतिष्ठापुर्ण जीवन जगण्यासाठी भारतीय राजस्व सेवेची भूमिका महत्वाची आहे ,असेही महापत्रा यांनी सांगितले.

याप्रसंगी अनुजा सारंगी यांनी शिकणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणाला कष्टाची जोड देऊन सार्वजनिक सेवेत आपला ठसा उमटवावा, असे आवाहन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना केले . यावेळी 75 व्या तुकडीतील अधिकाऱ्यांचा बद्दल माहिती सांगताना या प्रशिक्षण वर्गाचे संचालक शशी सकलानी यांनी सांगितले की या 75 व्या तुकडी मध्ये  2  अधिकारी हे रोयाल भूटान सर्व्हिसचे असून यामध्ये सर्वात जास्त 10 अधिकारी हे केरळ राज्यातून आहेत महाराष्ट्रातील 4 अधिकारी या तुकडीत आहेत. 75 टक्के अधिकाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अभियांत्रिकीची आहे. तर 60 टक्के  उमेदवारांना कामाचा अनुभव आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर या प्रशिक्षाणार्थी अधिकाऱ्यांना सहायक आयुक्त पदी नेमणुक दिली जाते.

या कार्यकमाला एनएडीटी मधील अधिकारी , 74 आणि 75 व्या तुकडीचे अधिकारी उपस्थित होते.