लग्नास नकार दिल्याच्‍या कारणावरुन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्‍न:आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद ,१३ एप्रिल  /प्रतिनिधी :- लग्नास नकार दिल्याच्‍या कारणावरुन अल्पवयीन मुलीला रस्यात अडवून बळजबरी तिचा हातधरुन धरुन फरपटत झाडाच्‍या आड नेत तिच्‍यावर अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्‍न केला. प्रकरणात आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांन्‍वये अडीच हजारांच्‍या दंडाची शिक्षा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी ठोठावली. अमोल रामदास गायके (२२) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात १४ वर्षीय मुलीनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, घटना घडण्‍याच्‍या वर्षभरापूर्वी पीडितेला लग्नासाठी आरोपी आमेल गायके याचे स्‍थळ आले होते. मात्र तो वाईट सवईचा असल्याने पीडितेच्‍या आई-वडीलांनी त्‍याला नकार दिला होता. त्‍यानंतर तो अधून-मधून पीडितेला शाळेत जाता-येता रस्‍त्‍यात अडवणूक करुन त्रास देत होता. ही घटना पीडितेने आई-वडीलांना सांगितली असता, त्‍यांनी त्‍याच्‍याकडे लक्ष देवू नको असे सांगितले. ११ मे २०१५ रोजी सायंकाळी पीडिताही सौचास जावून घरी परतत होती. त्‍यावेळी आरोपी तेथे आला, त्‍याने पीडितेला तु माझ्याशी लग्न कर असे म्हणाला, त्‍यावर पीडितेने त्‍याला नकार दिला. चिडलेल्या आरोपीने पीडितेचा हात पकडून तिला फरपट एका झाडाच्‍या आड नेले. तेथे आरोपीने तिच्‍यावर अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्‍न केला. पीडितेने आरडाओरड केल्याने पीडितेच्‍या आई-वडीलांसह शेजारील नागरिकांनी तेथे धाव घेतली. सर्वांना पाहून आरोपीने तेथून धूम ठोकली. प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलस उपनिरीक्षक कल्पना राठोड यांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी, सहायक सरकारी लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात फिर्यादीची साक्ष महत्‍वाची ठरली. फिर्यादीच्‍या साक्षीनंतर पुढील तारखेस सदरील प्रकरण हे न्‍यायालया बाहेर मीटले असून त्‍याबाबत तडजोड पत्र दाखल करण्‍यात आल्‍याचे आरोपीतर्फे सांगण्यात आले. तर सर्व साक्षीदार फितुर झाले असले तरी फिर्यादीच्‍या जबाबाकडे दुर्लक्ष करता येत नाही, त्‍यामुळे तडजोड पत्र ग्राह्यधरू नये अशी विनंती अॅड. बांगर यांनी न्‍यायालयाकडे केली.

सुनावणीअंती, दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी अमोल गायके याला दोषी ठरवून पोक्सेचे कलम ८ आणि भादंवी कलम ३५४ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड तसेच पोक्सोचे कलम १२ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्‍यायालयाने ठोठावली. प्रकरणात अॅड. बांगर यांना अॅड. रमेश ढाकणे यांनी सहाय केले.