पतीकडे का पाहते असे म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ:महिलेला सहा महिने सक्तमजुरी आणि विविध कलामान्‍वये १६ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,१२ एप्रिल  /प्रतिनिधी :-माझ्या पतीकडे का पाहते असे म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्‍याची, मुलींना उचलून नेण्‍याची धमकी देणाऱ्या महिलेला सहा महिने सक्तमजुरी आणि विविध कलामान्‍वये १६ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी ठोठावली. अनुपमा वसंतराव गंगाखेडकर (बुंदीले) (४७, रा. बी-२/४७ सनि सेंटर पिसादेवी रोड) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

प्रकरणात सनी सेंटर येथे राहणार्या नंदीनी भगवान सोनवणे (३८) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, २ ऑक्‍टोबर २०१५ रोजी आरोपी अनुपमा गंगाखेडकर (बुंदीले) हिने फिर्यादीला तु माझ्या पतीकडे का पाहते असे म्हणत वाद घालण्‍यास सुरवात केल्यांनतर जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादी तिला समजाविण्‍यासाठी गेली असता माझे पती पोलीस मध्‍ये आहेत माझे कोणी काही करु शकत नाही असे म्हणत जीवे मारण्‍याची आणि मुलींना उचलून नेण्‍याची धमकी दिली. तसचे तुमच्‍या पतीवर खोटे आरोप करुन त्‍यांना जेल मध्‍ये टाकीन अशी देखील धमकी दिली. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी अनुपमा गंगाखेडकर (बुंदीले) हिला दोषी ठरवून अॅट्रासिटीच्‍या कलम ३ (१)(१०) अन्‍वये सहा महिने सक्तमजुरी आणि १० हजारांचा दंड आणि भादंवी कलम ५०४ आणि ५०६ अन्‍वये एक महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी तीन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली.