वैजापूर तालुक्यातील नागमठाण शिवारात आढळली बिबट्याची पिले ; वनविभाग मात्र झोपेत

वैजापूर,११ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण जातेगाव शिवाराच्या हद्दीत रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात बिबट्याची दोन पिले आढळून आली. त्यावरुन ऊसात बिबट्याची मादी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेबाबत वनविभागाला कळवूनही कुठलीही कार्यवाही करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्व नाराजी पसरली आहे. 
तालुक्यातील नागमठाण शिवारात माजी पंचायत समिती सदस्य नारायण विखे यांच्या शेताजवळ असलेल्या विठ्ठल साबे यांच्या गट क्रमांक 182 मधील ऊसाच्या शेतात नागरिकांना दोन बछडे खेळताना आढळून आली. यावरुन ऊसाच्या शेतात मादी बिबट्या असण्याची दाट शक्यता आहे. या भागात यापुर्वी बिबट्याने हल्ला करुन शेतकऱ्यांना जखमी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात असतांना बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना काही दिवसांपुर्वीच घडली होती. मात्र त्यानंतरही वनविभागाने या ठिकाणी भेट देऊन पिंजरा लावणे, नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला नाही. त्यामुळे वनविभागाबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. वनविभागाने तातडीने या ठिकाणी भेट देऊन हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.