राम जन्मला ग सखी.. वैजापुरात जन्मोत्सवाचा उत्साह

वैजापूर,११ एप्रिल  /प्रतिनिधी :- करोनाचे सर्व निर्बंध उठवल्याने तब्बल दोन वर्षांनंतर रामजन्माचा उत्सव शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राम जन्मला ग सखी… सियावर रामचंद्र कि जयच्या निनादात प्रभु रामचंद्रांचा जन्मोत्सव मोंढा मार्केटमधील श्रीराम मंदिरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला. याशिवाय शहरातील संकट मोचन हनुमान मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिरातही प्रभु रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आरती करण्यात आली.

मार्केट उत्सव समितीचे सुरेश सोमाणी, सिताराम व्यवहारे, सुरेश तांबे, भगवान तांबे, संजय मालपाणी, काशिनाथ गायकवाड, संजय निकम, धोंडिरामसिंह राजपूत, यांच्या उपस्थितीत पुरोहित पैठणे यांनी विधिवत पुजन केल्यानंतर दुपारी बारा वाजता जन्मोत्सवाचा विधी पार पडला. संकट मोचन हनुमान मंदिरात पुरोहित जगदिश अंकुश व चेतन कंगरकर यांनी तर लक्ष्मीनारायण मंदिरात पुरोहित किशोर मेढे यांनी जन्मोत्सवाचा विधी पार पाडला. यावेळी काशिनाथ भावसार, डॉ. निलेश भाटिया, केशव आंबेकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमी निमित्त मोंढा मार्केटमधील राम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असुन आज (सोमवार) संजीव देखाव्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शोभेची दारुचेही आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.