कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई व नामांकित मल्ल यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देऊन गौरव

सातारा,९ एप्रिल  /प्रतिनिधी :- श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी पटकाविले. महाराष्ट्र केसरी कुस्तीची मानाची चांदीची गदा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई व नामांकित मल्ल यांच्या हस्ते  पै. पृथ्वीराज पाटील यांना देऊन गौरविण्यात आले.

Image

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व  जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 च्या अंतिम सामन्याचे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात करण्यात आले होते.  यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, बाळासाहेब लांडगे, साहेबराव पवार, दिपक पवार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी कुस्तीपटू उपस्थित होते.

Image

‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा मिळवलेला विजय त्याच्या लढाऊ वृत्तीचे व दृढ निर्धाराचे प्रतीक आहे. सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने इतिहास घडवला आणि २१ वर्षानंतर कोल्हापुर जिल्ह्याला हा किताब मिळून दिला.कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने ५-४ च्या फरकाने मुंबई पश्चिमच्या विशाल बनकरवर  मात केली.चार गुणांची पिछाडी भरून काढत विजय मिळवला. मुंबईचा पैलवान प्रकाश बनकर याला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले.

Image

दोन वर्षानंतर झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी २०२२ बनला आहे. तब्बल दोन दशकानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. 

 अटीतटीच्या लढतीत अखेर पृथ्वीराजने विशालला ५-४ ने मात दिली. अंतिम लढतीत पृथ्वीराज याने विशाल बनकर याला पराभवाची धूळ चारली.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेतकरी पुत्र पृथ्वीराज पाटीलने धडक मारली होती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा मिळवणारच असा विश्वास पृथ्वीराज पाटील याने व्यक्त केला होता. हा विश्वास त्याने सार्थ ठरविला.  

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुस्ती या खेळाला महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. कुस्ती या खेळात महाराष्ट्रातील मल्लांनी ऑलिंपिक पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव जगात व्हावे यासाठी राज्यातील मल्लांना शासनामार्फत सहकार्य केले जाईल.  महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना उत्साहात होत आहे. महाराष्ट्रात अनेक ताकतीचे मल्ल घडले आहेत.  निवृत्त झालेल्या मल्लांनी नवीन मल्ल घडविण्यासाठी पुढे यावे. तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मल्ल होणे हे सोपे नाही यासाठी मेहनत, आहाराबरोबरच कुस्तीतील डावपेच शिकावे लागतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी  कुस्ती प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज पाटील, उपविजेता विशाल बनकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई :- राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघाने आयोजित केलेल्या ६४ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान  पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता पैलवान मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा मिळवलेला विजय त्याच्या लढाऊ वृत्तीचे व दृढ निर्धाराचे प्रतीक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पृथ्वीराज पाटील सैन्यदलात सेवा करीत आहे, त्याने जिंकलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढणार आहे. पृथ्वीराज पाटील, विशाल बनकर, पुण्याचा हर्षद कोकाटे,  वाशिमचा सिकंदर शेख हे नव्या दमाचे पैलवान महाराष्ट्र कुस्तीची गौरवशाली परंपरा पुढे नेतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.