सावंगी इंटरचेंजमधील अंडरपासचे काम महिनाभरात पूर्ण होणार-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

·       जिल्हाधिकारी यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी

·       जळगांवकडे जाण्यासाठी वाहतूक कोंडी होणार नाही

औरंगाबाद,८ एप्रिल / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात समृध्दी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. 112 किलोमीटर समृध्दी महामार्ग जिल्ह्यातून जात आहे. समृध्दी महामार्गासाठी जिल्ह्यात 5 इंटरचेंज असून यापैकी 3 इंटरचेंजचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहेत. यापैकी सावंगी इंटरचेंजच्या अंडरपासचे काम प्रगतीपथावर असून महिनाभरात हे काम पूर्ण होऊन  जळगांव कडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी थांबणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

            जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नुकतीच समृध्दी महामार्गाच्या कामाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामांबाबतच्या सूचना दिल्या.

            जिल्ह्यातील 112 किलोमीटरच्या कामासाठी 2 कंपन्या कार्यरत आहेत. यापैकी मेघा एजन्सीकडे 54 किलोमीटरचे तर एल अँड टी कंपनीकडे 58 किलोमीटरचे काम दिलेले आहे. एल अँड टी कंपनीकडील काम शंभर टक्के पूर्ण झालेले असून मेघा एजन्सीकडील काम 95 टक्के पूर्ण झालेले आहे. समृध्दी महामार्गासाठी शेंद्रा एमआयडीसी, सावंगी, माळीवाडा, लासूर (हडस पिंपळगांव), जांभरगाव (वैजापूर)  असे एकूण 5 इंटरचेंज आहेत.  

            सावंगी येथील इंटरचेंजच्या अंडरपासचे काम प्रगतीपथावर असून ते महिनाभरात पूर्ण होणार आहे. यामुळे जळगांवला जाणाऱ्या व जळगांवहून येणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी होणार नाही असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.