खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिल 2022 पासून 18 वर्षांवरील वयोगटासाठी उपलब्ध होणार खबरदारीची लसमात्रा (प्रिकॉशन डोस)

आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वयोगटासाठी खबरदारीच्या लसमात्रेच्या मोफत लसीकरण कार्यक्रमाला दिली जाणार गती

देशातील 15 वर्षांवरील वयोगटापैकी सुमारे 96% लोकांना किमान एक तर सुमारे 83% लोकांना मिळाल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा

नवी दिल्ली,८ एप्रिल /प्रतिनिधी :-खाजगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड प्रतिबंधक लसींची खबरदारीची (प्रिकॉशन डोस) लसमात्रा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिल (रविवार), 2022 पासून 18 वर्षांवरील वयोगटाला खबरदारीची लसमात्रा देण्यास सुरुवात होईल. 18 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दुसरी लसमात्रा घेऊन 9 महिने पूर्ण झालेले  सर्वजण यासाठी पात्र असतील. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल.

देशातील 15 वर्षांवरील वयोगटापैकी सुमारे 96% लोकांना किमान एक तर सुमारे 83% लोकांना आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील लोकांना 2.4 कोटींहून अधिक खबरदारीच्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 12 ते 14 वयोगटातील 45% लोकांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.  

सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे पात्र लोकसंख्येसाठी पहिल्या आणि दुसऱ्या लसमात्रेसाठी तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वयोगटासाठी खबरदारीची  लसमात्रा देण्याचा मोफत लसीकरण कार्यक्रम सुरुच राहील तसेच त्याला  गती दिली जाईल.