बाभूळगावगंगा येथील गोदावरीच्या वाळूपट्टयातून “हप्त्याहप्त्याने” नियमबाह्य वाळू उपसा

शासकीय टेंडरच्या नावाखाली जेसीबी व पोकलेनद्वारे  नियमबाह्य वाळू उत्खनन
वैजापूर,६ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गोदावरी व शिवना नदीपात्रातील दोन वाळूपट्टयांची लिलाव प्रक्रिया होऊन अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त महसूल मिळाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा शांतपणे गाढ झोप घेत आहे तर दुसरीकडे ठेकेदार शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जेसीबी व पोकलेनने नियमबाह्य वाळू उपसा करीत असल्याचे चित्र असून “हप्त्याहप्त्याने” यामध्ये वाढ होत आहे. 

तालुक्यातील गोदावरी व शिवना नदीपात्रातील तीन वाळू घाटांपासून महसूल प्रशासनाला एक कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. मात्र ठेकेदारांच्या ‘चढाओढ’ मुळे तब्बल 8 कोटी 19 लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल प्रशासनाला मिळाला आहे. एक मार्च पासून या उत्खलनाला सुरूवात देखील झाली आहे. मात्र या उत्खनातून एक गंभीर बाब समोर आली आहे. वाळू लिलाव प्रक्रियेच्या नियमानुसार लिलाव झालेल्या घाटांमधून ठरवून दिलेल्या मापा एवढा वाळू उपसा हा ट्रॅक्टरद्वारे मजूरांच्या साह्याने लिलाव हद्दीच्या बाहेर टाकून तेथून वाहतूक करणे असा नियम आहे. मात्र या नियमांची पायमल्ली करून वैजापूर तालुक्यातील बाभूळगांव येथील गोदावरीच्या वाळू पट्टयातून जेसीबी व पोकलेनच्या साह्याने ठेकेदारांनी वाळू उपसा सुरू केला आहे. जिथं यंत्राची परवानगीच नाही तिथं थेट ते पाच ते सहा जेसेबी व पोकलेनच्या साह्याने उपसा केला जात आहे.विशेष म्हणजे या सर्व नियमबाह्य उत्खलनाला ग्रामस्थांचा देखील विरोध आहे. असे असले तरी या यंत्राद्वारे होणाऱ्या नियमबाह्य उत्खननाला अलिखित परवानगी तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या नियमबाह्य वाळू उपशाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. हा सर्व नियमबाह्य प्रकार चार दिवसांपासून सुरू असला तरी प्रशासनातर्फे या ठिकाणी साधी कारवाई होतांना दिसली नाही.
अभय कुणाचे ? 

एक तारखेपासून ठेकेदारांना आपल्या वाळू घाटाचा ताबा मिळाला आहे. तेंव्हापासूनच या सर्व ठिकाणी यंत्रणा वापरून वाळू उपसा केला आहे. यांची चर्चा जिल्हाभर पसरली असली तरी आमच्यापर्यंत असे व्हिडीओ पोहचले नसल्याचे स्थानिक  प्रशासनातर्फे सांगण्यात येते. ही गंभीर बाब म्हणावी लागेल. तर शासकीय टेंडर झालेल्या ठिकाणाचा ताबा ठेकेदारांना एक तारखेला देण्यात आला आहे. नियमानुसार जेसीबी व पोकलेन सारख्या यंत्रणा वापरून वाळू उपसा करता येत नाही असे होत असे तर निश्चितच कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार राहूल गायकवाड यांनी सांगितले.गंगाथडी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या गोदावरी नदीतून मागील अनेक वर्षापासून सर्रासपणे बेकायदा वाळू वाहतूक व्यवसाय सुरू आहे. प्रत्येक गावात ठरलेल्या पाँईट वरून वाळू वाहतुक चालायची, यामध्ये ज्यांची शेती नदीलगत आहे अशा शेतकऱ्याला आठवड्याला लक्ष्मीदर्शन घडवून तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने वर्षभरापासून अवैध वाळू व्यवसाय सुरू होता.मात्र, “मार्च एन्ड” च्या भीतीने वाळू  तस्करांनी आपला व्यवसाय थांबविला होता.    मात्र सध्या स्थितीत बाभूळगाव गंगा येथून पुन्हा नव्या जोमाने हळूहळू अवैध वाळू व्यवसाय सुरु झाला असून रात्रभर भयानक स्पीडने चालणाऱ्या गाड्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच नुकतेच तयार करण्यात आलेले रस्ते पुन्हा उखडण्याची भिती निर्माण झाली आहे. गोदाकाठील काही तरुणानी चौफुलीतून वाळू वाहतुक होऊ न देण्याचा निर्णय घेतल्याने तस्कर पर्यायी रस्त्याचा वापर करत असल्याचे समजते. 
जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी
गोदावरी पट्टयातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून यामध्ये शहरातील अनेक टोळ्यांचा समावेश आहे. सांयकाळी 5 ते 6 च्या दरम्यान सुरु होणारी अवैध वाळू वाहतुक कोणाच्या आशिर्वादाने सुरु असते हे न समजण्या पलीकडील कोडे आहे. अवैध व्यवसायामुळे या भागातील अनेक रस्त्यांची चाळणी झाली असून तरुण व्यसनाधीन बनले आहे. सध्याचे “छोटू दादा” वाळू पंटरांची  मुजोरी देखील वाढली आहे. त्यामुळे याप्रश्नी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांककडून होत आहे. विशेष बाब म्हणजे वैजापूर तालुक्यातून वाळूची ही तस्करी औरंगाबाद व अहमदनगर या दोन जिल्ह्याची वाळूची मागणी पूर्ण करत आहे.सदरील अवैधरीत्या सुरू असलेल्या वाळू उपशावर कोण लगाम लावेन ?प्रशासन या बेसुमार अवैध वाळूच्या चोरीवर पूर्णविराम लावेल का असा प्रश्न आहे. 

मागील महिन्यातील घटना

10 मार्च रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लाखनी हद्दीतील शिवना नदीपात्रातून एक विना क्रमांक जेसीबी व हायवा मध्ये  वाळू भरत असताना तहसीलदार राहुल गायकवाड हे आपल्या पथकासह कारवाईसाठी गेले असता त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून जेसीबी चालकाने तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यावर दातरी बकेट वारंवार फिरवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.