बंद पडलेल्या विनायक साखर कारखान्यातून भंगार साहित्याची चोरी ; 6 लाखांच्या मुद्देमालसह एकाला अटक

वैजापूर,६ एप्रिल  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील बंद असलेल्या विनायक सहकारी साखर कारखान्यातील बॉयलर संच, लोखंडी ॲगलचे तुकडे, पाईपचे तुकडे, लोखंडी चैन ब्लॉक असे जवळपास अडीच टन वजनाचे भंगार साहित्य जीपमधुन चोरुन घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी पकडले. कृष्णा ताराचंद डुकरे (26, रा. बोरसर) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून बोलेरो जीप व लोखंडी साहित्य असा एकूण साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला. 

वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे विनायक सहकारी साखर कारखाना असून मागील जवळपास पंचवीस वर्षांपासून हा कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत आहे. या कारखान्यातुन भंगार साहित्य चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.

सहा एप्रिल रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल अमोल मोरे यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, परसोडा येथील विनायक सहकारी साखर कारखान्यातून भंगार साहित्याची चोरी होत असून एका बोलेरो जीप मधून या साहित्याची वाहतुक करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलिस नाईक झाल्टे, अमोल मोरे, गृहरक्षक दलाचे तुरे यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले. त्यांनी खंडाळा ते परसोडा जाणाऱ्या रस्त्यावर दबा धरुन परसोड्याच्या दिशेने येणाऱ्या जीपला (एम. एच.20 सी.टी. 9601) थांबवले व विचारणा केली असता जीप चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने परसोडा येथील बंद पडलेल्या साखर कारखान्यातुन लोखंडी भंगार चोरुन आणल्याचे सांगितले. पोलिसांनी जीपसह लोखंडी साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.