नाभिक समाजासाठी अभ्यासगट नेमणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई,५ एप्रिल  /प्रतिनिधी :- नाभिक समाजाचा अभ्यास  करण्याबाबत  लवकरच अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेण्यात येईल तसेच नाभिक समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन या समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नाभिक समाजाच्या प्रश्नांबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव दिनेश डिंगळे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती  गजभिये, नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, दामोदर बिडवे, सुरेंद्र कावरे यासह या समाजाचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

मंत्री श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातंर्गत उच्चस्तरीय समिती नेमून नाभिक समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. नाभिक समाजासंदर्भात बार्टीने केलेला अभ्यास तसेच समाजाने  सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी मांडलेल्या सूचनांबाबत कार्यवाही करण्यात येईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये नाभिक समाजाला ठराविक आरक्षण मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी बैठकीत दिली.