महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य – विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य – विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नवी दिल्ली, ५ एप्रिल  /प्रतिनिधी :- ‘महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य आहे. या राज्यातील महिलांच्या रक्तात आणि आत्म्यातच नेतृत्वगुण भिनला आहे. राणी लक्ष्मी बाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, मृणाल गोरे, भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सर्वांच्या कार्याने आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत. हे सर्वजण महाराष्ट्राची शान आणि अभिमान आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५०% आरक्षणही जाहीर केले आहे. आज विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण हे नक्कीच भावी प्रवासात मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही,’ असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोकसभा सचिवालयातील प्राईड सभागृहात केले.

आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सदस्यांकरिता नवी दिल्लीमध्ये प्राइड संस्था आणि लोकसभा सचिवालय यांच्यावतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी उपसभापती डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, संसदीय आयुधांचा वापर करून आपल्या कार्यशैलीने जनहिताची कामे करता येतात. यासाठी विविध आयुधे, नियम, प्रक्रिया यांची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. विविध विषयांची माहिती घेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची प्रशिक्षणे निश्चितच उपयोगी ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांचे उद्घाटनपर भाषण झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणाला महाराष्ट्रातून १०० पेक्षा अधिक नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांनी हजेरी लावली आहे. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, महेंद्र काज आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.