आयुक्त केंद्रेकर यांच्या दणक्यानंतर चैत्र पाडव्याच्या मुहूर्तावर वैजापूर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची स्वछता मोहीम

वैजापूर,४ एप्रिल  /प्रतिनिधी :-तहसील कार्यालयात चैत्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कर्मचा-यांनी कंबर कसून स्वच्छता मोहीम नीटनेटकेपणे राबविल्यामुळे तहसील कार्यालयाचा चेहरा स्वच्छतेमुळे सुंदरतेने खुलला होता. तहसील इमारतीच्या दर्शनी भागात नागरिकांनी पान तंबाखू खाऊन भिंतीवर मारलेल्या पिचकारीमुळे मळालेल्या भिंतीचे काेपरे रंगरंगोटीने पूर्वरत करण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करुन कार्यालय चकचकीत करण्यात आले.

०१ एप्रिल रोजी तालुका प्रशासनाच्या  मुख्यालयाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अचानक प्रशासकीय भेट दिली होती.” तहसील कार्यालयातील अस्वच्छतेवर” त्यांनी तीव्र शब्दांत विभाग प्रमुखाकडे नाराजी नोंदवून परिसराची स्वच्छता करा अशी कानटोचणी केली होती.मराठवाडा महसूल विभाग प्रमुखांनी तहसील  कार्यालयातील टापटीपपणा, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे खडे बोल सुनावल्यामुळे महसूल विभागातील अधिकारी – कर्मचा-यांत खळबळ उडाली होती.पाडव्याची शासकीय सुट्टी असताना  कर्मचा-यांनी तहसील कार्यालय परिसराची स्वच्छता करण्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले होते.प्रत्येक विभागातील कर्मचा-यांनी त्यांच्या परिसरातील दर्शनी भागातील केर – कचरा गोळा करुन स्वच्छता केल्यामुळे कार्यालय परिसर चकचकीत झाला. 

कर्मचा-यांना स्वच्छता राखण्याची ताकीद-तहसीलदार राहूल गायकवाड 

तहसील परिसरात कर्मचा-यांना त्यांचे प्रशासकीय कामकाज करण्याचे ठिकाण स्वच्छ व सुंदर राखण्याची सक्त ताकीद दिली आहे.एखाद्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्यास विभागप्रमुखांवर हलगर्जीपणा केल्याची जबाबदारी निश्चित केली जाईल असे तहसीलदार राहूल गायकवाड यांनी सांगितले.