लालमाती वस्तीचा पाण्याचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लागणार

आ.सतीश चव्हाण यांचा पुढाकार

औरंगाबाद,४ एप्रिल  /प्रतिनिधी :- खुलताबाद शहराजवळील म्हैसमाळ रस्त्यावरील लालमाती वस्तीचा पाण्याचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावा, वस्तीवरील प्रत्येक कुटुंबाला घरकूल देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

लालमाती वस्तीला रविवारी आ.सतीश चव्हाण यांनी भेट देऊन तेथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. लवकर आपल्या अडचणी मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी या वस्तीवरील नागरिकांना दिले होते. लालमाती वस्तीवासीयांनी भेटीदरम्यान कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी खुलताबाद नगरपालिकेच्या टाकीतून थेट लालमातीपर्यंत पाईपलाइन टाकणे तसेच वस्तीवरील प्रत्येक कुटुंबाला घरकुल देण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. लालमाती वस्तीवर लवकरच कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रत्येक कुटुंबाला घरकूल देण्यासाठी मी स्वत: शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी वस्तीवरील नागरिकांना सांगितले होते. त्यानुसार आ.सतीश चव्हाण यांनी पुढाकार घेत हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली. येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच घरकूलाचा प्रश्न सुनील केंद्रेकर यांच्या निदर्शनास आणून देत प्राधान्याने हे प्रश्न सोडवण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे खुलताबाद विधानसभा अध्यक्ष श्री.महेश उबाळे यांची उपस्थिती होती.

     सुनील केंद्रेकर यांनी देखील आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करू लागू नये यासाठी आठ दिवसात लालमाती वस्तीवर पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, तसेच येथील प्रत्येक कुटुंबाला घरकूल देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सुचना त्यांनी जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण यांना दिल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.