मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीची श्रीमंती जगाला कळावी- मुख्यमंत्री

मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

Image

मुंबई,२ एप्रिल /प्रतिनिधी :- मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, देशातीलच नव्हे तर परदेशातील माणसंही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे, असे जगातील सर्वोत्तम भवन उभे रहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीची श्रीमंती जगाला कळावी- मुख्यमंत्री

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, राहुल शेवाळे, आमदार दिवाकर रावते, सुनिल शिंदे, आशिष शेलार, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषा भवनचे भूमिपूजन आणि फलकाचे अनावरण करण्यात आले.

Image

उपस्थित जनसमुदायाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, हे भवन केवळ मराठी भाषा भवन नसून ते आपल्या मातृभाषेचे मंदीर आहे. आज या शुभमुहुर्तावर आपल्या मातृभाषेच्या मंदिराचे भूमिपूजन करत आहोत. याचा आनंद, समाधान आहे. जबाबदाऱ्या पार पाडतांना काही जबाबदाऱ्या आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद देणाऱ्या असतात. आजची जबाबदारी माझ्यासाठी अशीच माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद देणारी घटना आहे.

Image

मराठी भाषेच्या वाटचालीचा उल्लेख करतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मराठी माणुस म्हटलं की संघर्ष आलाच. भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचे स्मारकही येथे जवळच आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही. मुंबईसाठी ज्यांचे आजोबा लढले, मुंबई मिळाल्यानंतर मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा काम ज्यांनी केले. त्यांच्यासाठी मराठी भाषा भवन तयार करण्याची बाब अभिमानाची आहे.

Image

या राज्यात दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. जास्तीत जास्त भाषा शिकणे गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये.

पारतंत्र्य काय असते हे आपल्याला बघायला मिळाले नाही हे आपले नशिब आहे पण इंग्रजांच्या राजवटीत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा अग्रलेख लिहून इंग्रजाना लोकमान्य टिळकांनी मराठीतूनच जाब विचारला होता. मराठी भाषेचे महत्व यावरुन अधोरेखित होते. रोजच्या वापरातील प्रशासकीय मराठी भाषाही सोपी असावी, असा आग्रह मुख्यंमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला. व्यपगत, नस्ती सारखे शब्द कळायला कठीण आहेत त्याला पर्यायी शब्द सुचविण्याचे काम मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हाती घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे ठणकावून सांगितले. एवढेच नाही तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. शिवाजी महाराजांनी त्यांचे खलितेही सोप्या भाषेत केले.

इतर भाषेचा द्वेष नको पण त्यांचे आक्रमणही नको. कर्नाटकात मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, सहन करणार नाही. छत्रपतींच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा आणि या भाषेचे तेज तळपले पाहिजे महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या मातृभाषेचे हे मंदिर आहे. याचे काम करतांना कुठलीही कमतरता नसावी असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.

भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक- उपमुख्यमंत्री अजित पवार

भाषा हे संस्कृतीचे प्रवाही रुप आहे. भाषा प्रवाही असली पाहिजे. त्यासाठी इतर भाषेतल्या शब्दांना सामावून घ्यावे लागेल. ती मानसिकताही तयार करावी लागेल. केवळ एकमेकांशी मराठीत बोलण्याने मराठी भाषेचं संवर्धन होईल. हीसुद्धा एक भाबडी आशा आहे. मात्र हे सर्व करत एक ठोस कृती कार्यक्रम तयार करावा लागेल. केवळ सरकारवर सगळं सोडून चालणार नाही. समाज म्हणून प्रत्येकाने यामध्ये सक्रीय सहभाग दिला पाहिजे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिपादन केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोणतीही भाषा नुसती ओठातून येवून उपयोग नाही तर ती पोटातून आली पाहिजे. कोणतीही भाषा टिकायची असेल तर, ती भाषा बोलणाऱ्याचं पोट भरण्याचे सामर्थ्य, त्या भाषेत असणे आवश्यक असते. त्यासाठी ती उद्योगाची, रोजगाराची भाषा असणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही उद्योगाची व्हावी, यासाठी शासनाबरोबरच आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

भाषेची उपयोगिता वाढवल्याशिवाय त्या भाषेचे महत्वं, गौरव, सन्मान वाढत नाही. त्यासाठी, मराठी भाषा ही जागतिक संवादाची, संपर्काची, व्यवहाराची, अर्थार्जनाची भाषा कशी होईल, हे बघितले पाहिजे. मराठी भाषेला शक्तिशाली, प्रभावी भाषा बनवायची असेल तर, मराठी ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. मराठीची उपयोगिता वाढली पाहिजे. आपली भाषा केवळ अभिजात तर असायलाच हवी परंतु ती बहुजात आणि बहुज्ञात व्हायला पाहिजे, असेही श्री.पवार म्हणाले.

मराठी भाषेच्या संरक्षण, संवर्धनासाठी, आपण अनेक माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला आणि आज त्याचे भूमीपूजन होत आहे, याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे.

आज भूमीपूजन होत असलेले मराठी भाषा भवन, नियोजित वेळेत पुर्ण होईल. मराठी भाषेच्या बरोबरीने, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी अभिमान, मराठी स्वाभिमान जिवंत ठेवण्यात, वाढवण्यात हे मराठी भाषा भवन येणाऱ्या काळात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

जगभरातील मराठी भाषिकांना जोडून घेणारे मराठी भाषा भवन- मंत्री सुभाष देसाई

Image

आज जगभरातील 80 देशांत मराठी भाषा बोलली जाते या सर्व मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासद्वारे मराठी भाषा भवनातून जोडले जाणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले, या भवनात चार कालखंड दाखविले जाणार आहेत. यात पहिला खंड प्राचीन मराठीचा असेल यात मराठी भाषेच्या दोन अडीच हजार वर्षांपासूनचा इतिहासाचे दर्शन असेल. मध्ययुगीन मराठी, ब्रिटीशकालीन कालखंडात मराठीची गती आणि प्रगती तसेच आधुनिक कालखंडात मराठीने कशी झेप घेतली,याचे दर्शन मराठी भाषा भवनात होणार आहे.

मुंबईमध्ये मराठी भाषा भवन साकार होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. मराठी भाषा भवन राजधानीत मुंबईत महत्वाच्या ठिकाणी होण्याची सर्वांची इच्छा होती. त्यानुसार मोक्याची जागा उपलब्ध झाली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सहकार्य केल्याने या ठिकाणी मराठी भाषा भवन तयार होते आहे. यासाठी देशातील नामवंत वास्तूविषारद यांची स्पर्धा घेण्यात आली. त्यातून जेष्ठ वास्तूविषारदकार पी के दास यांची संकल्पना निवडली गेली. इमारतीच्या आत मराठी भाषेचे, जीवनाचे दर्शन यातून घडेल. भव्य, अर्थपूर्ण, चांगला संदेश, अभिमानाची भावना जागृत होईल, असे हे दर्शन असेल.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासनाने महत्वाची पाऊले उचलली आहेत. सर्व मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय अनिवार्य केला. दुकानांच्या पाट्या मराठीतून लावणे बंधनकारक केले आहे. प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार मराठीतून केला जाईल. माय मराठी या अॅपच्या माध्यमांतून मुंबई विद्यापीठाने मराठी शिकवण्यासाठी सुविधा निर्माण केली आहे. या मराठी भाषा भवनामध्ये तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम असेल.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव सुरू करण्यात येत आहे. पहिल्यांदा प्रत्येक महसूल विभागात एक याप्रमाणे सुरू करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात येईल. मराठीचे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मराठीतील कठिण शब्द सोपे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या भूखंडाच्या शेजारी दोन भूखंड आहेत. तीन इमारती उद्योग विभागाच्या आणि शिक्षण विभागाच्या आहेत. त्या ठिकाणी भव्य इमारती उभ्या राहू शकतील. शिक्षण विभागाचे विद्या मंदिर आणि उद्योग मंदिर या ठिकाणी उभे राहू शकते. आम्ही त्याची जबाबदारी घेतो. असे आवाहनही श्री. देसाई यांनी केले.

मराठी भाषा भवन मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब- राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

मराठी भाषा भवन मुंबईत मरिन ड्राईव्हसारख्या महत्वाच्या ठिकाणी उभे राहणार आहे, ही प्रत्येक मराठी भाषिकासाठी अभिमानाची बाब आहे, असे मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले.

डॉ. कदम म्हणाले, राज्यातील साहित्यिक, संस्कृती जतन करणारी ही वास्तु उभी राहणार आहे. मराठी भाषेला गौरवशाली इतिहास आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सामान्य जनतेने केंद्राला लाखोच्या संख्येने विनंती पत्र पाठवली आहेत. मराठी भाषा हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. राज्यात पुस्तकांचे गाव ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
मराठी भाषा भवन वेळेत तयार होईल आणि त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे राज्यमंत्री डॉ.कदम यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी केले.