गृहमंत्रीपदावरुन महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल,गृहकलह मिटला?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज आहेत. या बातम्या येऊन धडकताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट वर्षावर धाव घेतली.

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राज्यातील नेत्यावर कारवाई करत आहे. मात्र, पुरावे देऊनही भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यानं मुख्यमंत्री नाराज असल्याच्या बातम्या गेले काही दिवस चर्चेत होत्या.या बेबनावाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान गृहखात्याला अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केलीय.मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीनंतर वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्र्यांना नेहमीच भेटत असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री आणि माझी भेट शासकीय आणि विभागीय कामांसाठी होत असते. आजची भेटही तशीच असल्याचं वळसे-पाटील म्हणाले.

विधानसभेत विरोधाने उपस्थित केलेल्या  कायदा आणि सुव्यवस्थावरील चर्चेला उत्तर देताना गुरहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री आमच्या कामावर खुश आहेत. ते सातत्याने चौकशी करत असतात, असे सांगितले होते.

ही बैठक संपवून गृहमंत्री मंत्रालयात येत नाहीत तोच मुख्यमंत्री कार्यालयाकडून या बातम्यांचे, चर्चांचे खंडन करण्यात आले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्र्यांनाच विचारा’

शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वत:कडे घ्यावं, असा सल्ला दिलाय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवलं होतं. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही गृहखातं स्वत:कडे घ्यावं, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत. त्याबाबत वळसे पाटील यांनाच विचारलं असता, याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं तर बरं होईल, असं वळसे पाटील म्हणालेत.

‘मुख्यमंत्री गृहखात्याबाबत अजिबात नाराज नाहीत’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्याच्या कारभारावरुन नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. वळसे-पाटील यांना याबाबत विचारलं असता, मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केला आहे. मुख्यमंत्री गृहखात्याबाबत अजिबात नाराज नाहीत. संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. आमच्या विभागाकडून कमतरता होत असेल तर सुधारणा होईल, असं वळसे पाटील म्हणाले.

‘..तर कारवाई करताना आम्ही मागेपुढे पाहत नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबतही विचारलं असता भाजपबाबत भूमिका सॉफ्ट की हार्ड हे मला कळत नाही. कारवाई केली तर ती न्यायालयात टिकायला हवी. चूक असेल तर कारवाई करताना आम्ही मागेपुढे पाहत नाही, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.

शिवसेनेला हवंय गृहमंत्रिपद? 

महाविकास आघाडीत गृहमंत्रिपदावरून संघर्ष पेटला आहे. गृहमंत्र्यांच्या मवाळ कारभारावर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाहीत, तर शिवसेनेसह काँग्रेसचे नेतेही नाराज असल्याचं समजतंय. भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही राष्ट्रवादीचे गृहमंत्री वळसे पाटील ठोस कारवाई करत नसल्याची तक्रार शिवसेना-काँग्रेस मंत्र्यांची आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये छुपा समझौता आहे की काय, अशी शंका घेतली जाते आहे. त्यामुळंच शिवसेनेकडं गृहखातं सोपवण्याची मागणी पुढं येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेला का हवंय गृहखातं?

शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात पुरावे दिले. मात्र गृहमंत्र्यांकडून ठोस कारवाई झाली नाही
पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यास गृहमंत्रिपद शिवसेनेकडे सोपवा, अशी मागणी पुढं आल्याचं समजतंय.
केंद्रीय यंत्रणाचा वापर करून मविआ नेत्यांना त्रास दिला जातोय..
मात्र पोलीस यंत्रणेचा वापर करताना राष्ट्रवादी हात आखडता घेत असल्याचं बोललं जातंय.
सत्कार समारंभात तलवार हाती घेतली म्हणून काँग्रेस मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले.
त्यामुळं काँग्रेसमध्येही नाराजी वाढल्याचं समजतं आहे.