कोणत्याही तणावाशिवाय उत्सवाच्या भावनेने परीक्षेला सामोरे जा-पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • तंत्रज्ञानाचा वापर संधी म्हणून करा, आव्हान म्हणून नाही”
  • “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठीची सल्लामसलत झाली पूर्ण. याबाबत भारतभरातील लोकांचा घेतला सल्ला.
  • “20 व्या शतकातील शिक्षण व्यवस्था आणि संकल्पना 21 व्या शतकातील आपला विकासमार्ग ठरवू शकत नाहीत.  काळानुरूप बदलायला हवे”
  • “शिक्षक आणि पालकांची अपूर्ण स्वप्ने विद्यार्थ्यांवर लादली जाऊ शकत नाहीत. मुलांनी स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे महत्वाचे आहे”

नवी दिल्ली,१ एप्रिल /प्रतिनिधी :- परीक्षा पे चर्चाच्या (पीपीसीPPC) 5 व्या भागात, पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला.  संवादापूर्वी त्यांनी कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंग आणि राजीव चंद्रशेखर यांच्यासह राज्यपाल आणि मुख्यमंत्री, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आभासी माध्यमातून सहभागी झाले.  संपूर्ण संवादात पंतप्रधानांनी संवादात्मक, आनंदी आणि संभाषणात्मक वातावरण कायम ठेवले.

गेल्या वर्षीच्या आभासी संवादानंतर आता आपल्या तरुण मित्रांशी संवाद साधत असल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आनंद व्यक्त केला. पीपीसी हा त्यांचा आवडता कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.  उद्यापासून विक्रम संवत नवीन वर्ष सुरू होत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि आगामी अनेक सणांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पीपीसीच्या 5 व्या भागात पंतप्रधानांनी एक नवीन प्रथा सुरू केली. त्यांना आता जे प्रश्न कार्यक्रमात सहभागी करुन घेता येणार नाहीत त्यांची उत्तरे  व्हिडीओ, ऑडिओ किंवा लिखित स्वरुपात नमो अॅपवर दिली जातील, असे त्यांनी सांगितले.

पहिला प्रश्न दिल्लीच्या खुशी जैनने विचारलाचा.  बिलासपूर, छत्तीसगड येथून, वडोदराच्या किनी पटेल यांनीही परीक्षेशी संबंधित ताण आणि तणावाबद्दल विचारले.  त्यांनी दिलेली ही पहिलीच परीक्षा नसल्याने ताण घेऊ नये असे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.    आधीच्या परीक्षांमधून मिळालेला अनुभव आगामी परीक्षांवर मात करण्यास मदत करेल. अभ्यासाचा काही भाग कदाचित सुटला असेल परंतु त्त्याबद्दल ताण घेऊ नका असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि दैनंदिन दिनचर्या तणावरहीत आणि नैसर्गिक राखली पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सूचवले. इतरांचे अनुकरण करुन काहीही करण्यात अर्थ नाही, दिनचर्यी योग्य ठेवा आणि उत्सवी मनोवस्थेत काम करा.

पुढचा प्रश्न होता म्हैसूर, कर्नाटकच्या तरुण यांचा. विचलित करणाऱ्या यूट्यूब इत्यादी अनेक ऑनलाइन व्यवधानात ऑनलाइन अभ्यास कसा करायचा हे त्यांनी विचारले. दिल्लीचा शाहिद अली, तिरुवनंतपुरम, केरळचा कीर्थना आणि कृष्णगिरी, तामिळनाडू येथील शिक्षक चंद्रचूडेश्वरन यांच्याही मनात हाच प्रश्न होता.  पंतप्रधान म्हणाले की समस्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन अभ्यास पद्धतींमध्ये नाही.  ऑफलाइन अभ्यासातही मन खूप विचलित होऊ शकते.  “माध्यम नसून मन ही समस्या आहे”, असे ते म्हणाले. ऑनलाइन असो की ऑफलाइन, जेव्हा मन अभ्यासात असते तेव्हा विचलित होण्याची समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत  नाही. तंत्रज्ञान विकसित होत राहील आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणात नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे असे ते म्हणाले.  शिकण्याच्या नवीन पद्धतींकडे आव्हान म्हणून न बघता त्या संधी म्हणून स्वीकारल्या पाहिजेत.  ऑनलाइनमुळे तुमचे ऑफलाइन शिक्षण वाढू शकते. ऑनलाइन संकलनासाठी आहे आणि ऑफलाइन स्वतःला घडवण्यासाठी, कार्य करण्यासाठी आहे असे त्यांनी सांगितले.  डोसा तयार करण्याचे उदाहरण त्यांनी दिले.  डोसा बनवणे ऑनलाइन शिकता येईल पण तयारी आणि वापर मात्र ऑफलाइनच होईल.  आभासी जगात जगण्यापेक्षा स्वतःबद्दल विचार करण्यात आणि स्वतःच्या सोबत राहण्यात खूप आनंद आहे असे ते म्हणाले.

हरियाणातील पानिपतमधील शिक्षिका सुमन राणी यांनी विचारले की नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी विशेषकरून  विद्यार्थ्यांचे आणि सर्वसाधारणपणे  समाजाचे जीवन  कशा प्रकारे समृद्ध  करतील आणि ते नवीन भारताचा मार्ग कसा घडवतील. मेघालायच्या पूर्व खासी हिल्स, येथील शिला यांनीही याच धर्तीवर प्रसन्न विचारला. पंतप्रधान म्हणाले की हे ‘राष्ट्रीय’ शैक्षणिक धोरण आहे, ‘नवीन’ शैक्षणिक धोरण नाही. विविध हितधारकांबरोबर बरेच विचारमंथन केल्यानंतर धोरणाचा मसुदा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा  एक विक्रम असेल. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी व्यापक सल्लामसलत झाली. यावर भारतभरातील लोकांशी सल्लामसलत करण्यात आली होती,” ते म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितले की, हे धोरण सरकारने नव्हे तर नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी देशाच्या विकासासाठी बनवले आहे. ते म्हणाले, पूर्वी शारीरिक शिक्षण आणि प्रशिक्षण हे अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रम होते. पण आता त्यांना शिक्षणाचा भाग बनवून नवीन प्रतिष्ठा मिळवून दिली जात आहे. ते म्हणाले की 20 व्या शतकातील शिक्षण प्रणाली आणि कल्पना 21 व्या शतकात आपला विकासाचा मार्ग ठरवू शकत नाहीत. ते म्हणाले की बदलत्या प्रणालींसह आपण विकसित न झाल्यास आपण त्यातून बाहेर फेकले जाऊ आणि मागे पडू. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एखाद्याची आवड जोपासण्याची संधी देते. पंतप्रधानांनी  ज्ञानासोबत कौशल्याच्या महत्वावर भर दिला. ते म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून कौशल्यांचा समावेश करण्याचे हेच कारण आहे. विषयांच्या निवडीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेली लवचिकताही त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची योग्य अंमलबजावणी केल्यास नवीन कवाडे उघडतील. त्यांनी देशभरातील शाळांना विद्यार्थ्यांनी शोधलेल्या नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचे आवाहन केले.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रोशिनीने निकालाबद्दल तिच्या कुटुंबाच्या अपेक्षा कशा हाताळायच्या आणि पालकांच्या म्हणण्यानुसार शिक्षण गांभीर्याने घ्यायचे की सण म्हणून त्याचा आनंद घ्यायचा हे विचारले. पंजाबच्या भटिंडा येथील किरण प्रीत कौरचाही प्रश्न याच धर्तीवर होता. पालक आणि शिक्षकांनी त्यांची स्वप्ने विद्यार्थ्यांवर लादू नयेत असे पंतप्रधानांनी सांगितले. “शिक्षक आणि पालकांची अपूर्ण स्वप्ने विद्यार्थ्यांवर लादली जाऊ  शकत नाही. प्रत्येक मुलाने स्वतःच्या स्वप्नांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे,” पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही विशेष क्षमता असते हे मान्य करून ते शोधून काढण्याचे आवाहन त्यांनी पालक व शिक्षकांना केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची  ताकद ओळखून आत्मविश्वासाने वाटचाल करण्यास सांगितले.

दिल्लीच्या वैभव कन्नौजियाने  विचारले की बरेच काही करायचे बाकी असताना प्रेरणा कशी मिळवावी आणि यशस्वी कसे व्हावे. ओदिशाचे पालक सुजित कुमार प्रधान, जयपूरच्या कोमल शर्मा आणि दोहाच्या आरोन एबेन यांनीही अशाच विषयावर प्रश्न विचारला. पंतप्रधान म्हणाले, “प्रेरणेसाठी कोणतेही इंजेक्शन किंवा सूत्र नाही. त्याऐवजी, स्वतःला अधिक चांगले जाणून घ्या आणि तुम्ही कशामुळे आनंदी होता ते शोधा आणि त्यावर कार्य करा.” त्यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिकरित्या प्रेरित करणाऱ्या गोष्टी ओळखण्यास सांगितले, त्यांनी या प्रक्रियेत स्वायत्ततेवर भर दिला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यथांबद्दल सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नका असे सांगितले. सभोवतालची मुले, दिव्यांग आणि निसर्ग आपले ध्येय साध्य करण्यासाठी कसे प्रयत्न करतात याचे निरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. “आपण आपल्या सभोवतालच्या प्रयत्नांचे आणि सामर्थ्याचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे”, ते म्हणाले. ‘परीक्षेला’ पत्र लिहून आणि स्वत:च्या ताकदीने आणि तयारीने परीक्षेला आव्हान देऊन कशी प्रेरणा मिळू शकते, हे त्यांनी त्यांच्या एक्झॅम वॉरिअर या पुस्तकाचा संदर्भ देत सांगितले.

तेलंगणाच्या खम्मम येथील अनुषा म्हणाली की शिक्षक जेव्हा त्यांना शिकवतात तेव्हा तिला ते विषय समजतात परंतु काही काळानंतर ते लक्षात राहत नाही तर याबाबत काय करावे. गायत्री सक्सेना यांनी नमो अॅपद्वारे स्मरणशक्ती आणि समज याविषयीही प्रश्न विचारला. एकाग्रतेने विषय शिकला तर सर्वकाही लक्षात राहील, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना वर्तमानात पूर्णपणे सजग राहण्यास सांगितले. वर्तमानाबद्दलची ही जागरूकता त्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करेल. ते म्हणाले की वर्तमान हा सर्वात मोठा ‘उपहार’ आहे आणि जो वर्तमानात जगतो आणि त्याला पूर्णपणे समजून घेतो तो जीवनात जास्तीत जास्त यशस्वी होतो. त्यांनी त्यांना स्मृती शक्तीचा खजिना राखण्यास आणि तो वृद्धिंगत करण्यास सांगितले. ते असेही म्हणाले की गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी मन स्थिर असणे हे सर्वात महत्त्वाचे  आहे.

झारखंडच्या श्वेता कुमारीने सांगितले कि तिला रात्री अभ्यास करायला आवडते पण दिवसा अभ्यास करायला सांगितले जाते. राघव जोशी यांनी नमो अॅपद्वारे अभ्यासासाठी योग्य वेळापत्रकाबद्दल विचारले. पंतप्रधान म्हणाले की एखाद्याच्या प्रयत्नाचे फलित आणि त्यासाठी लागलेला कालावधी याचे मूल्यांकन करणे चांगले आहे. ते म्हणाले की प्रयत्न आणि फलित यांचे विश्लेषण करण्याची ही सवय शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते म्हणाले की अनेकदा आपण सोप्या आणि आवडीच्या विषयांसाठी जास्त वेळ घालवतो. यासाठी ‘मन, हृदय आणि शरीराची फसवणूक’ टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. “तुम्हाला आनंद वाटेल अशा गोष्टी करा आणि तेव्हाच तुम्हाला जास्तीत जास्त परिणाम मिळेल”,असे पंतप्रधान म्हणाले.

ज्या व्यक्तींकडे ज्ञान असते मात्र काही कारणांमुळे ते योग्य परीक्षांना बसू शकत नाहीत, अशा लोकांसाठी काय करता येऊ शकेल, असे जम्मू आणि काश्मीरमधल्या उधमपूरच्या एरिका जॉर्जने विचारले. बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली तयारी कशी करायची, असे गौतम बुद्ध नगरच्या हरी ओम मिश्रा या विद्यार्थ्याने विचारले.

परीक्षांसाठी अभ्यास करायचा हा विचार चुकीचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जर एखाद्याने मनापासून आपल्या अभ्यासक्रमाची तयारी केली तर वेगवेगळ्या परीक्षांचा दबाव येत नाही. त्यामुळे केवळ परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या इतकाच विचार न करता एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळवण्याचा उद्देश असला पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

क्रीडापटू एखाद्या स्पर्धेचे नव्हे तर त्या खेळाचे प्रशिक्षण घेत असतात. “ तुम्ही एका विशेष पिढीचे प्रतिनिधी आहात. तुमच्या काळात खूप जास्त प्रमाणात स्पर्धा आहे हे जरी मान्य असले तरी जास्त संधी देखील आहेत,” असे ते म्हणाले. स्पर्धा म्हणजे तुमच्या काळातील सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहे असे मानत जा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

गुजरातमधल्या नवसारी इथल्या एक पालक सीमा चौहान यांनी पंतप्रधानांना असे विचारले की ग्रामीण भागातील मुलींच्या उत्थानासाठी समाज कशा प्रकारे योगदान देऊ शकतो.

यावर पंतप्रधान म्हणाले की गेल्या काही वर्षात परिस्थितीत खूप मोठा बदल झाला आहे. एके काळी मुलींना शिकवण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मुलींना योग्य शिक्षण दिल्याशिवाय कोणताही समाज सुधारणा करू शकत नाही, यावर त्यांनी भर दिला. आपल्या कन्यांचे सक्षमीकरण आणि त्यांना मिळणाऱ्या संधी यांचे संस्थात्मकीकरण झाले पाहिजे. मुली हा एक बहुमूल्य ठेवा बनू लागला आहे आणि हा बदल अतिशय स्वागतार्ह आहे, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतात लोकसभेमध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त महिला सदस्य आहेत आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे प्रमाण सर्वोच्च आहे.

“मुलगी ही कुटुंबाची ताकद असते. आपल्या स्त्री शक्तीकडून जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये होणारी उत्कृष्ट कामगिरी पाहण्यापेक्षा चांगले काय असू शकते”, असे पंतप्रधानांनी विचारले.

पर्यावरणाच्या रक्षणाकरिता योगदान देण्यासाठी नव्या पिढीने काय केले पाहिजे, असे दिल्लीच्या पवित्रा रावने विचारले.

आपला वर्ग आणि पर्यावरण स्वच्छ आणि हरित कसे करता येईल, असे चैतन्य याने विचारले. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि हा देश स्वच्छ आणि हरित बनवण्याचे श्रेय त्यांना दिले. बालकांनी नकारात्मकतेला बाजूला सारले आणि खऱ्या अर्थाने पंतप्रधानांची स्वच्छतेची प्रतिज्ञा विचारात घेतली. आज आपल्याला जे पर्यावरण उपभोगायला मिळत आहे त्यामध्ये आपल्या पूर्वजांचे योगदान आहे. त्याच प्रकारे आपण देखील आपल्या नंतर येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी एक अधिक चांगले पर्यावरण राखले पाहिजे, असे ते म्हणाले. नागरिकांच्या योगदानाद्वारेच हे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले. प्रो प्लॅनेट पीपल या पी3 चळवळीच्या महत्त्वावर भर दिला. आपल्याला ‘वापरा आणि फेकून द्या’ या संस्कृतीचा त्याग केला पाहिजे आणि चक्राकार अर्थव्यवस्थेच्या जीवनशैलीकडे वळले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशाच्या विकासामध्ये विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे आणि अमृत काळाचा कालखंड एकच असल्याने या कालखंडाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. एखाद्या कर्तव्याचे पालन किती महत्त्वाचे असते यावर देखील त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेत आपले कर्तव्य बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.

या कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि हाताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलावून घेतले आणि त्यांचे कौशल्य आणि आत्मविश्वास याची प्रशंसा केली. इतरांमध्ये असलेल्या गुणांचे कौतुक करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची वृत्ती विकसित करण्याच्या आवश्यकतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आपल्यामध्ये दुसऱ्याच्या गुणवत्तेचा मत्सर करण्याऐवजी शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. आयुष्यात यश मिळवण्यासाठी ही क्षमता अतिशय महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवाचा दाखला देत त्यांच्यासाठी परीक्षा पे चर्चाचे महत्त्व नमूद केले. तरुण विद्यार्थ्यांशी बोलत असताना आपल्याला देखील आणखी 50 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते, असे त्यांनी सांगितले. “ मी तुमच्या पिढीशी संपर्क साधून तुमच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधतो तेव्हा मला तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमची स्वप्ने यांचे दर्शन घडते आणि मी माझे आयुष्य त्याप्रकारे घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा कार्यक्रम मला स्वतःचा विकास करण्यामध्ये मदत करतो. माझी स्वतःची मदत करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो.”, असे सांगत अतिशय आनंदित झालेल्या पंतप्रधानांनी या कार्यक्रमाचा समारोप केला.