औरंगाबाद पालिकेचा १७२८ कोटींचा अर्थसंकल्प

तीन  वर्षांत पालिकेच्या अर्थसंकल्पात   ८३६ कोटींची  वाढ 

रस्त्यांच्या कामांसाठी दोनशे कोटींची तरतूद

प्रशासक आस्तिककुमार पांडेय

औरंगाबाद ,३१ मार्च /प्रतिनिधी :- महापालिकेचा २०२२ – २३ या वर्षाचा १७२८ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा  अर्थसंकल्प प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (३१ मार्च) सादर केला. हा  अर्थसंकल्प एक कोटी ७६ लाख ९ हजार रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले . प्रशासक म्हणून पांडेय यांनी सादर केलेला हा तिसरा अर्थसंकल्प असून तीन वर्षात पालिकेचा अर्थसंकल्प ८३६ कोटींनी वाढला आहे. या अर्थसंकल्पात  रस्त्यांच्या कामांसाठी दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी २०२१ – २२ या वर्षाचा सुधारित आणि २०२२ – २३ या वर्षाचा नवीन अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला. सुधारित अर्थसंकल्पात ९६ कोटी ७२ लाख ९९ हजार रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली. नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात १७२८ कोटी १५ लाख ८० हजार रुपये जमा आणि १७२६ कोटी ३९ लाख ७१ हजार रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे एक कोटी ७६ लाख नऊ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गतवर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे ५५० कोटींची तर तीन वर्षात ८३६ कोटींची वाढ झाली आहे.

प्रशासकांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, संतोष टेंगळे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, लेखाधिकारी संजय पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, नगर रचना विभागाचे संचालक ए.बी.देशमुख आदी उपस्थित होते.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी

  • रस्त्यांच्या कामासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील ज्या रस्त्यांचे अद्याप मजबुतीकरण व बांधणी झालेली नाही अशा रस्त्यांची कामे या तरतूदीतून केली जाणार आहेत.
  • दिव्यांगांसाठी सतरा कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी अठरा कलमी कार्यक्रमाची घोषणा
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संशोधन केंद्र , छत्रपती शिवाजी महाजार संशोधन केंद्र, भगवान महावीर संशोधन केंद्र या तीन संशोधन केंद्रांचे काम नवीन आर्थिक वर्षात सुरु केले जाणार आहे. तिन्हीही संशोधन केंद्रांसाठी प्रत्येकी दोन कोटी म्हणजे एकूण सहा कोटींची तरतूद.
  • महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात भडकलगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नुतनीकरण व सौंदर्यीकरण (दोन कोटी रुपये), टीव्ही सेंटरजवळ महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणे (दीड कोटी रुपये), महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणे (एक कोटी रुपये), वामनदादा कर्डक यांचा पुतळा उभारणे (२५ लाख रुपये) या पुतळ्यांचा समावेश
  • माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांच्या वॉर्डात आवश्यक ती विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये या प्रमाणे ११५ कोटींची तरतूद 
  • घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी ट्रान्सपोर्ट  स्टेशन उभारणे
  • शहराच्या सीमेवर प्रवेशव्दार बांधण्यासाठी एक कोटींची तरतूद.
  • महापालिकेच्या मालकीचे चार पेट्रोलपंप उभारणे.
  • मध्यवर्ती जकात नाका येथे महापालिकेची प्रशासकीय इमारत 
  • कांचनवाडी, शहानुरवाडी येथे महापालिकेच्या जागेवर व्यापारी संकुल.