तलवार मागविणाऱ्या तिघांना पोलिस कोठडी

औरंगाबाद ,३१ मार्च /प्रतिनिधी :- पंजाब येथून ऑनलाइन कुरिअरच्या माध्यमातून मागविलेला तलवारीचा साठा बुधवारी दि.३० पोलिसांनी जप्‍त केला. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी तपास करुन डीटीडीसी कुरिअरच्‍या मॅनेजरसह तलवार मागविणाऱ्या तिघांना बुधवारी रात्री अटक केली. चौघा आरोपींना एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.डी. कुर्हेकर यांनी गुरुवारी दिले.

वाल्मिक चोखा जोगदंड (४४, रा. संजयनगर मुकुंदवाडी) असे मॅनेजरचे तर तुषार रमेश बोराडे (२२, रा. एन-२, ठाकरे नगर सिडको), आदित्‍य रावसाहेब शिरगुळे (२२, रा. माळीपुरा आण्‍णाभाऊ साठे शॉपींग सेंटर जुना जालना) आणि अफसर खान रशीद खान (२३, रा. आरतीनगर, मिसारवाडी) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून पंजाब राज्यातील जालिंधर आणि अमृतसर या शहरातून मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा कुरिअरच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती क्रांतिचौक पोलिसांना मिळाली होती. माहिती आधारे पोलिसांच्या पथक निराला बाजार येथील डी.टी.डी.सी.या कुरिअर कार्यालयावर झडती घेण्याकरिता गेला असता व्यवस्थापक जोगदंड याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यालयाची झडती घेत आरोपी आसिफ एस.के (रा. डीमार्ट जवळ जालना), शेख राजा (रा. कागजीपुरा), राजु शेख (रा. रायली गल्ली, निना फक्शन हॉल औरंगाबाद), योगेश पवार (रा. आरएल स्‍टील कपंनी पैठण रोड चितेगाव), अफसर खान (रा. आरिफ नगर, मिसारवाडी), आदित्‍य शिरगुळे (रा. जालना), तुषार बोराडे (रा. ठाकरे नगर) यांचे नावे आलेले सात बॉक्स जप्‍त केले. त्‍यात ३७ तलवारी आणि १ कुकरी असे ३८ शस्त्रे मिळून आले.या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक विकास खटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपी मॅनेजरने तलवारींच्‍या साठ्याची माहिती न देता पोलिसांची दिशाभूल केली. अशा प्रकारे यापूर्वी देखील गुन्‍हा घडला असून त्‍यात आरोपी मॅनेजरचा काही संबंध होता काय याचा तपास करायचा आहे. डी.टी.डी.सी या कुरिअर कपंनी मार्फत यापूर्वी देखील अशा प्रकारे शस्‍त्रसाठा मागविण्‍यात आला होता काय याचा तसेच जप्‍त करण्‍यात आलेली शस्त्र आरोपींनी कशा करिता मागविली होती याचा तपास करायचा आहे. आरोपींनी यापूर्वी देखील अशी शस्त्रे मागविली होती काय, याचा तपासकरुन आरोपींच्‍या घरांची झडती घ्‍यायची आहे. गुन्‍ह्यातील उर्वरित आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयकडे केली.