तृतीय पंथी ओळख दिनानिमित्त मतदार नोंदणीची विशेष शिबिराचे आयेाजन

औरंगाबाद ,३० मार्च /प्रतिनिधी :- 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांचे मार्फत तृतीय पंथीयाच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केलेले आहे. 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत ही नोंदणी शिबिरे राबवली जाणार आहेत.

            तृतीय पंथीयाकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. 18 ते 21  वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्याच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वत्:च वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्राचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गंत म्हणजे मतदार नोंदणीच्या मोहिमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली होती. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 22 तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी करण्यता आली.

            औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. जिल्‌ह्यातील ज्या भागात तृतीय पंथीयांच्या मोठ्या प्रमाणपत्र वसाहती आहेत, अशा ठिकाणी मतदार नोंदणीची शिबिरे आयोजित केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.