गुटख्‍याचा साठा करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद ,३० मार्च /प्रतिनिधी :-गुटख्‍याचा साठा करणाऱ्याला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने मंगळवारी दि.२९ रात्री अटक केली. त्‍याच्‍या ताब्यातून दोन लाख ४४ हजार ५१५ रुपयांचा गुटखा जप्‍त करण्‍यात आला आहे. सय्यद अजिम सय्यद युनूस (४२, रा. भिमनगर, दौलताबाद) असे आरोपीचे नाव आहे.आरोपीला गुरुवारपर्यंत दि.३१ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.एच. खेडकर यांनी बुधवारी दिले.

या प्रकरणात गुन्‍हे शाखेचे सहायक फौजदार रमाकांत पटारे (५६) यांनी फिर्याद दिली. गुन्हे शाखेच्‍या पथकाने दौलताबाद येथील राजवाडा परिसरात छापा टाकुन आरोपीला अटक केली. व त्‍याच्या ताब्यातून दोन लाख ४४ हजार ५१५ रुपयांचा गुटखा जप्‍त करण्‍यता आला. या प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीकडून जप्‍त केलेला मुद्देमाल त्‍याने कोठून व कोणाकडून आणला व कोणाला विक्री करणार होता. गुटखा खरेदी-विक्री करणारी मोठी टोळी असण्‍याची शक्यता असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली..