औरंगाबादमध्ये २२ फीडरवर भारनियमन

औरंगबाद,२९मार्च /प्रतिनिधी :- विजेच्या वाढत्या मागणीमुळे औरंगाबाद शहरातील ज्या भागात थकबाकीचे व वीज वितरण हानी अधिक आहे अशा २२ फीडरवर मंगळवारी महावितरणला भारनियमन करावे लागले आहे. ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी तातडीने भरून सहकार्य करावे, नसता पुढील काही दिवस भारनियमन अपरिहार्य आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
    राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल साधण्यासाठी तसेच विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात भार व्यवस्थापन करण्यासाठी शहरात भारनियमन करण्यात आले.     महावितरणने वितरण व वाणिज्यिक हानीनुसार वीज वाहिन्यांचे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-१, जी-२ व जी-३ असे गट तयार केलेले आहेत. शहरात एकूण १५० फीडर आहेत. औरंगाबाद शहरात मंगळवारी सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान  ई ते जी-३ या वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी असलेल्या पाच गटातील २२ फीडरवर अर्धा ते पाऊण तास भारनियमन केले. विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काही दिवस भारनियमन अटळ आहे, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.