औरंगाबादेत ‘एम्स’ सुरू करण्यासाठी डॉ.भागवत कराड यांनी पुढाकार घ्यावा-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद ,२९ मार्च /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.29) डॉ.भागवत कराड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने दरभंगा (बिहार), अवनीपुरा (जम्मू-काश्मीर), मनेठी (हरियाणा) या राज्यात नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. औरंगाबाद (महाराष्ट्र) शहरात देखील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था सुरू व्हावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. आपण स्वत: यासाठी पुढाकार घेणार होतात. मात्र या मागणीचा कुठेही विचार करण्यात आला नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी डॉ.भागवत कराड यांच्या निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे.

‘एज्युकेशन हब’ म्हणून औरंगाबादची ओळख होऊ लागली आहे. ‘एम्स’ सारखी राष्ट्रीय पातळीवरील संस्था जर औरंगाबादेत सुरू झाली तर येथील शैक्षणिक वातावरणाला आणखी बळकटी मिळेल. औरंगाबाद शहरात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात (घाटी) मराठवाड्यासह विदर्भ तसेच खानदेशातील विविध जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे घाटीवर मोठा ताण येतो. त्यामुळे ‘एम्स’ संस्था याठिकाणी सुरू झाली तर घाटीवर येणारा रूग्णांचा अतिरिक्त ताण कमी होईल. शिवाय वैद्यकीय पदवी व पदवीव्युत्तर अभ्यासक‘माच्या जागा देखील वाढतील. त्याच बरोबर मराठवाड्यातील गोर गरीब रूग्णांना विविध अत्याधुनिक उपचार या माध्यमातून मिळण्यास मदत होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.

          आपल्या रूपाने मराठवाड्याला पहिल्यांदाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पद मिळाले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएएम) औरंगाबाद शाखेच्यावतीने सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आपला सत्कार करण्यात आला होता. याप्रसंगी आपण औरंगाबादेत ‘एम्स’ ही संस्था सुरू करणे हेच माझे ध्येय असल्याचे सांगितले होते. आपण स्वत: डॉक्टर असल्याने मराठवाड्यातील नागरिकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था त्वरीत सुरू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.