कुंडलिका पुल: हत्ती गेला अन् शेपटासाठी चालढकल।

पुला ऐवजी पश्चिम दिशेने होणार रस्ता 

जालना ,२९मार्च /प्रतिनिधी :-जालना शहरालगत असलेल्या कुंडलिका नदीवर रखडलेल्या पुलाच्या उभारणी बाबत  प्रशासनाचे वराती मागून घोडे दामटणे सुरू असून  पुलाऐवजी नदीच्या पश्चिम दिशेने नवीन रस्ता  उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी दरही निश्चित केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून रिवार्ड कॉपी मिळाल्यानंतरच पुढील कामास गती मिळेल असे बांधकाम विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 
घनसावंगी सह शंभर गावांना जालना शहराशी जोडणाऱ्या जालना- गाढेसावरगांव- घनसावंगी या राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाले असून जालना शहरालगत असलेल्या कुंडलिका नदीवरील पूल उभारणीचे काम अनेक वर्षांपासून तसेच रखडले. सध्या असलेल्या छोट्या पुलावर पावसाळ्यात नदीला पूर येतो. परिणामी पुलावरून पाणी वाहत असल्याने शंभर गावांचा जालना शहराशी संपर्क तुटतो. पुलावरून पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी स्वार पाण्यात वाहून गेले. तर कित्येकांना आपला जीव गमवावा लागला.

नागरिकांचे बळी जाऊन सुध्दा पुल उभारणी बाबत प्रशासकीय पातळीवर कुठल्याच हालचाली होत नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदने दिली, प्रत्येक गावांत स्वाक्षरी मोहीम राबवली. गतवर्षी जल आंदोलनही केले.  मात्र प्रशासनाच्या वेळ काढू धोरणामुळे नवीन पुल उभारणीस एक दगड ही टाकला नसल्याचे दिसते. अस्तित्वातील पुल वाहतूकीसाठी तांत्रिक दृष्ट्या अयोग्य असल्याचे नमूद करत नदीच्या पश्चिमेस सर्वे क्रं. 370 व 341मध्ये   नवीन रस्ता आखणी चा प्रस्ताव करण्यात आला आहे. भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत असून जिल्हाधिकारी यांनी दरही निश्चित केले आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून रिवार्ड कॉपी मिळाल्यानंतर खरेदी ची कारवाई करून रस्त्याचे काम करण्यात येईल. असे जागतिक बँक प्रकल्प उपविभाग-2 औरंगाबाद च्या शाखा अभियंत्यांनी सांगितले. 

पावसाळ्यापूर्वी काम व्हावे : ओमप्रकाश चितळकर 

ओमप्रकाश चितळकर 


जिल्ह्याचे ठिकाण जोडणारा कुंडलिका नदीवर पुल उभारणीसाठी गत वर्षभरापासून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे वारंवार पाठपुरावा केला जातोय. शंभर गावात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.त्यास  सर्व गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. एवढ्या वरच न थांबता पुलावर पाण्यात उतरून आंदोलन ही केले. मात्र प्रशासन अद्याप पर्यंत कागदोपत्री घोडे नाचवण्यात दंग आहे. असा थेट आरोप रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांनी केला. दरवर्षी पावसाळ्यात येथे बळी जातात. या घटनांची यंदा पुनरावृत्ती होणार नाही. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी ,युद्ध पातळीवर पुल अथवा रस्ता पावसाळ्या पुर्वी करावा असे ओमप्रकाश चितळकर यांनी सांगितले. 

पंधरा दिवसांत रिवार्ड : एस डी एम. 
नवीन रस्त्यासाठी अंदाजे एक एक्कर जागा संपादित केली जाणार असून आगामी पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना रिवार्ड कॉपी मिळेल. असे उपविभागीय अधिकारी सानप यांनी सांगितले.