नागपूर- मुंबई महामार्गावर करंजगांव जवळ गॅसचा टँकर पलटी ; वाहतुकीची कोंडी

वैजापूर,२९मार्च /प्रतिनिधी :- नागपूर- मुंबई महामार्गावर करंजगावजवळ असलेल्या वळण रस्त्यावर गॅसचा टँकर पलटी झाल्याची घटना सोमवारी (ता.28) रात्री घडली. टँकर रस्त्यावर पलटी झाल्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. आज दुपारी हे टँकर क्रेन व अग्निशामक दलाच्या सहाय्याने रस्त्यावरून उचलून बाजूला करण्यात आले.त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

नागपूर – मुंबई रस्त्यावर करंजगांवजवळ वळण रस्ता असून, याठिकाणी नेहमीच अपघात होतात. अपघाताची ही मालिका सुरूच आहे.  गॅस पुरवठा करणारा टँकर (क्रमांक एम. एच. 48, ए.जी. 8784) हा गॅस भरून मनमाड येथून औरंगाबाद येथे खाली करण्यास जात होता.रस्त्यात करंजगाव शिवारात असलेल्या वळणावर सदर टँकर पलटी झाला.या अपघातात टॅंकर चालक थोडक्यात बचावला. काही वेळ  वाहतूकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली.

वैजापूर पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दल, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. अग्निशामक दल आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतूक बंद केली. गॅस टँकर पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते.या टॅंकरमधून गळती होऊन वास येत असल्याचे नागरीकांनी सांगितले.या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.रात्री उशीरापर्यंत मदत कार्य सुरू होते.
रस्त्यावर पलटी झालेल्या गॅस टँकरला आज दुपारी क्रेन व अग्निशामक दलाच्या मदतीने रस्त्यावरून  बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. वैजापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे शेख वसीम व त्यांच्या सहकाऱ्यांनी याकामी मदत केली.