महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान

Image

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव

राष्ट्रपतींनी डॉक्टर बालाजी तांबे (मरणोत्तर), सुलोचना चव्हाण, सोनू निगम यांना पद्मश्री प्रदान केली

नवी दिल्ली,२८ मार्च  /प्रतिनिधी :-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी  डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Image

महाराष्ट्रातून शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम आणि आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुसऱ्या टप्प्यात 2 पद्मविभूषण, ५ पद्मभूषण आणि 53 पद्मश्री  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कला क्षेत्रातील उल्लेखनीय  योगदानासाठी  किराणा  घराण्याच्या  ज्येष्ठ  गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या मानाच्या नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून डॉ. अत्रे यांचा भारतीय अभिजात संगीतात नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबतच ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत अशा संगीत प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा देश-विदेशात प्रसार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे  लेखनही  त्यांनी केले आहे. कलाश्रेत्रातील योगदानासाठी त्यांना यापूर्वी  पद्मभूषण (2002) आणि पद्मश्री (1990)  या नागरीसन्मानानेही  गौरविण्यात आले आहे.

लावणी सम्राज्ञी  ज्येष्ठ लोकगीत गायिका सुलोचना चव्हाण यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी  पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या ७५ वर्षांपासून त्या  गायनक्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीमती चव्हाण  या, १९४६  पासूनच  हिंदी चित्रपटांमध्ये गायन करू लागल्या. ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये गायनास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी गुजराती,भोजपुरी,तामिळ,पंजाबी भाषांमध्येही भजन ,गझल असे विविध प्रकारचे गायन केले आहे.

प्रसिध्द पार्श्वगीत गायक सोनू निगम  यांनाही  कला  क्षेत्रातील  उल्लेखनीय योगदानासाठी  पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. लॉर्ड ऑफ कॉर्ड्स नावाने प्रसिध्द असलेल्या सोनू निगम यांनी हिंदी, मराठीसह एकूण १० भाषांमध्ये ४ हजार गीत  गायिली आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी आयुर्वेदाचार्य  डॉ. बालाजी  तांबे  यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला  होता आज या कार्यक्रमात  त्यांच्या पत्नी  वीणा तांबे  यांनी  राष्ट्रपतींच्या हस्ते  हा  पुरस्कार स्वीकारला. डॉ. तांबे यांनी आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ कार्य  केले. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवरही संशोधन केले आहे. त्यांनी लाखो रुग्णांवर उपचार केले. दूरचित्रवाणीहून त्यांनी हजारो  कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार- प्रसार केला . त्यांनी आयुर्वेदावर ५० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत.

डॉक्टर प्रभा अत्रे – पद्मविभूषण – कला क्षेत्र

डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका आहेत.

किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभा  अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी झाला.  प्रभा  अत्रे   यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला आणि विशेषतः किराणा घराण्याच्या गायनकलेला नवीन दिशा दिली. भारतीय संगीत कलेला पाश्चिमात्य देशात लोकप्रियता मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत. 1969 पासून त्या पूर्णवेळ संगीत मैफिली करू लागल्या. आवाज लावण्याची पद्धत, सुस्पष्ट शब्दोच्चारण  आणि परिणामकारक भावना अविष्कार यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीतात नवीन जाणीव आणली.

संगीत या एकाच विषयावर, एकाच वेळी डॉक्टर प्रभा अत्रे यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत, हा जागतिक विक्रम असावा. त्यांच्या पुस्तकामुळे संगीत रसिकांना संगीतकला  समजून घेण्यास  मदत झालीच शिवाय  संदर्भ म्हणूनही या पुस्तकांना वेगळे मोल आहे. ‘डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन’ ची स्थापना करून    प्रभा अत्रे   यांनी आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जबाबदाऱ्या निभावल्या.  प्रतिभावान विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलाकार म्हणून आकार देण्यासाठी तसेच संगीत रसिकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘स्वरमयी गुरुकुल’ ची स्थापना केली.

डॉक्टर प्रभा अत्रे यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये 1990मधील पद्मश्री , 2002  मधील   पद्मभूषण आणि 1991  मधील   संगीत नाटक अकादमी पुरस्कार  या प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.

श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे (मरणोत्तर)- पद्मश्री -वैद्यकीय क्षेत्र

श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे आघाडीचे, जागतिक ख्यातीचे आयुर्वेद वैद्यकीय तज्ञ अध्यात्मिक गुरु आणि लोकशिक्षक होते. त्यांनी आयुर्वेद, योग, ध्यान, वैदिक जीवनपद्धती आणि संगीतोपचार या क्षेत्रांमध्ये असामान्य योगदान दिले. ‘आत्मसंतुलन ग्राम’ हे भारतातील सर्वात मोठे पंचकर्म केंद्र तसेच ‘संतुलन आयुर्वेद’ या भारतात आणि परदेशातही आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्राचे ते संस्थापक होते. ‘ओम कुर्सेत्रम’  या युरोपमधील पहिल्या आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राचेही ते संस्थापक होते.
28 जून 1940 रोजी जन्मलेले डॉक्टर तांबे वेदांचे अभ्यासक वासुदेव तांबे शास्त्री यांचे सुपुत्र.  त्यांनी 1960 मध्ये यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि 1964 मध्ये आयुर्वेद वैद्य विशारद ही पदवीही मिळवली.

तांबे हे फॅमिली डॉक्टर या नावाने महाराष्ट्रात ओळखले जात असंत.

दर आठवड्याला एक दशलक्षाहून जास्त प्रति निघणाऱ्या सकाळ वृत्तपत्राच्या पुरवणीमध्ये त्यांनी 18 वर्षांहून अधिक काळ  लिखाण केले. या कालावधीत त्यांनी 3400 हून जास्त लेख लिहिले.

वैद्यकीय ज्ञान सामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगणे हे आधुनिक आयुर्वेदाला त्यांनी दिलेले विशेष योगदान मानले जाते. डॉक्टर तांबे यांचे 10 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले.

सुलोचना चव्हाण – पद्मश्री- कला क्षेत्र

सुलोचना चव्हाण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना कदम या मराठीतील लावणी या प्रकारासाठी ओळखल्या जाणाऱ्या गायिका .

13 मार्च 1933 रोजी जन्म झालेल्या सुलोचना चव्हाण यांनी  संगीत क्षेत्रातील आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला वयाच्या दहाव्या वर्षीच आरंभ केला. 1960 पासून सुलोचना चव्हाण यांंनी महाराष्ट्रातील विदर्भ, खान्देश आणि मराठवाडा या प्रदेशातील विविध शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये अनाथालये आणि रुग्णालये यांना देणगी मिळवून देण्यासाठी जाहीर कार्यक्रम केले, डॉक्टर भुसारी यांच्या कुलधाम या रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय उपकरणे मिळवून देण्यासाठी त्यांनी नऊ लाखाचा निधी उभारला. पानशेत धरण फुटीने आलेल्या पूरातील पीडितांना मदत करण्यासाठीदेखील त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 1969 मध्ये त्या त्यांनी नागालँड मधल्या भारतीय सैनिकांसाठी कार्यक्रम केला होता.

1955 मध्ये कलगीतुरा या मराठी चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा लावणी गायली. ‘मला हो म्हणतात लवंगी मिरची’ ही त्यांची लावणी. या लावणीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत जवळपास 70 हिंदी चित्रपटात अडीशे गाणी गायली आहेत, तर मराठी चित्रपटांमध्ये पाच हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यामध्ये त्यांना गायनासाठी मिळालेला 1965 मध्ये मिळालेला लावणीसम्राज्ञी,, महाराष्ट्र शासनाकडून 2010 मध्ये मिळालेला लता मंगेशकर पुरस्कार,  तसेच 2011 मध्ये मिळालेला लावणी कलावंत पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे त्यांना 2012 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

सोनू निगम पद्मश्री कलाक्षेत्र

सोनू निगम हे गायक संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. झळाळत्या, उत्कट आणि उच्च रसोत्कर्षाचा अनुभव देणाऱ्या मंचीय सादरीकरणासाठी ते प्रसिद्ध आहेत.

30 जुलै 1973 साली जन्मलेल्या सोनू निगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गाण्याला सुरुवात केली.  दिल्लीत मोहम्मद ताहीर जी त्यानंतर मुंबईत गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. सोनू यांनी 28 हून अधिक भाषांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत.  सारेगमप या संगीत स्पर्धेवर आधारित दूरचित्रवाणी  कार्यक्रमाचे ते निर्माते होते. संगीतातील स्पर्धेवर आधारित असा हा जगातील पहिला कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमाने संपूर्ण खंडातील सर्वसामान्य माणसांच्या मनातील  संगीताची कल्पनाच बदलून टाकली. या कार्यक्रमाने शास्त्रीय तसेच चित्रपट संगीतातील वरिष्ठ आणि प्रसिद्ध कलाकार आणि उभरत्या तरुण कला प्रतिभावंतांना त्यांनी एका मंचावर आणले त्यामुळे संपूर्ण खंडातच संगीत क्षेत्रात क्रांती घडून आली.

‘संदेसे आते है’ या त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्याने भारतीय सैनिकांना घातलेले भुरळ अजूनही कायम आहे. ‘ये दिल दिवाना’ या वेगळ्या धाटणीच्या गाण्याने त्यांना बहुमुखी प्रतिभेचे गायक म्हणून ओळख दिली. 2014 मध्ये जल या सिनेमातील त्यांच्या गाण्याने त्यांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.

सोनू यांना कल हो ना हो या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

नागरी सत्कार सोहळा -I हा 21 मार्च रोजी आयोजित केला होता. राष्ट्रपतींनी 2022 या वर्षासाठीचे 128 पद्मपुरस्कार  प्रदान केले.  त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा मान्यवर व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले. दहा पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांपैकी 21 मार्च 2022 रोजी पुरस्कार मिळालेल्या सहा जणांची यादी खालील प्रमाणे.

पद्मभूषण

१) नटराजन चंद्रशेखरन – व्यापार आणि उद्योग

२) सायरस पूनावाला – व्यापार आणि उद्योग

पद्मश्री

१) डॉक्टर हिम्मतराव बावस्कर –  वैद्यकीय क्षेत्र

२) डॉक्टर विजय कुमार विनायक डोंगरे – वैद्यकीय क्षेत्र

३) डॉक्टर भीमसेन सिंघल – वैद्यकीय क्षेत्र

४) अनिल कुमार राजावंशी – विज्ञान आणि अभियांत्रिकी

पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे त्याचे तीन उपप्रकार आहेत. कला, सामाजिक कार्य ,लोकसेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकी , व्यापार आणि उद्योग , वैद्यक क्षेत्र, साहित्य आणि शिक्षण , क्रीडा, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रातील कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.

अपवादात्मक आणि विशेष उल्लेखनीय सेवेसाठी पद्मविभूषण, अत्युच्च उल्लेखनीय सेवेसाठी पद्मभूषण तर कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी पद्मश्री दिली जाते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला  हे पुरस्कार जाहीर होतात.