आत्मनिर्भर होण्यासाठी आत्मसन्मान आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे-जेष्ठ विचारवंत राम माधव

नांदेड ,२८ मार्च  /प्रतिनिधी :- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आजादी का अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. पण अजूनही आपण बऱ्याच वस्तू आयात करीत आहोत. काही निवडक वस्तू सोडल्या तर आपण आपल्या देशात सर्व काही निर्मिती करू शकतो पण आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास हा कुठेतरी कमी पडतो म्हणून आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याजवळ आत्मसन्मान आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. असे मत दिल्ली येथील जेष्ठ विचारवंत राम माधव यांनी व्यक्त केले.  

ते दि.२८ मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च प्रायोजित, शिक्षणशास्त्र संकुल आणि फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त आयोजनामध्ये ‘आत्मनिर्भर भारत कौशल्याधिरीत शिक्षण’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, संत बाबा बलविंदरसिंगजी, नरेंद्र बंसल, पियुष जैन, आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैयजंता पाटील, शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सी.आर. बाविस्कर, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. सिंकू कुमार सिंह यांची उपस्थिती होती. 

पुढे जेष्ठ विचारवंत राम माधव म्हणाले की, जगभरातील तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत आहे. आजचे केलेले संशोधन उद्या मागे पडत आहेत. त्यामुळे आपल्याला तीस वर्षानंतरचा विचार केला पाहिजे. तीस वर्षानंतर आपल्या काय गरजा असणार आहेत याचा विचार आज केला पाहिजे आणि त्यावर आधारित कौशल्य विकसित केले पाहिजे. दररोज स्वतःला अद्यावत करायला शिका आज इंजीनियरिंग पेक्षा इम्याजनिअरिंग खरी गरज आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी जी कौशल्य आपण विकसित करतो ते कौशल्य आता अद्यावत झाले पाहिजे तरच देश खरा आत्मनिर्भर होईल. 

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाबद्दलची अद्यावत माहिती दिली आणि म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये कौशल्यावर आधारित असे शिक्षण दिले जात आहे. आंतरविद्याशाखेद्वारे विद्यार्थ्यांच्या आवडी नुसार तो ज्या विषयात शिक्षण घेतो त्या शिवाय इतरही आवडीच्या विषयांमध्ये शिक्षण घेण्याची त्याला संधी देण्यात येते. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्र्सिंह बिसेन आणि गुरुद्वारा येथील संत बाबा बलविंदरसिंगजी यांचेही मार्गदर्शन झाले. 

दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी या परिषदेसाठी आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सिंकू कुमार सिंह यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. भीमा केंगले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुनिता पाटील, डॉ. महेश जोशी, डॉ. उदय चव्हाण, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अशोक गिनगीने, डॉ. महेश नळगे, पारस यादव, गणेश कदम, कुलजीत राणा, ज्योतिबा हुरदुके, उमेश भोसले, नीळकंठ श्रावण, शंकर जैन, अब्दुल अन्सार, अजिंक्य चव्हाण इत्यादी परिश्रम घेत आहेत.