माहेश्वरी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अशोकराव चव्हाण

संजय बियाणी यांच्या स्व. कांताबाई बालाप्रसादजी बियाणी  पार्कचे थाटात लोकार्पण

नांदेड,२८ मार्च  /प्रतिनिधी :-माहेश्वरी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. शासनाची योग्य भूमिका पार पाडत या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे प्रतिपादन करतानाच संजय बियाणी निर्मित स्वर्गीय कांताबाई बालाप्रसादजी बियाणी पार्कचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोकार्पण केले .

महेश आवास योजनेतून 73 घरांच्या चाव्या पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते लाभधारकांना स्वाधीन करण्यात आल्या. संजय बियाणी डेव्हलपर्सने उभारलेल्या या अद्ययावत अशा घरकुलांचे फ्लॅटचे सायंकाळी सोनेरी क्षणात लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर , माजी मंत्री डी पी सावंत, विधान परिषद गट नेते आमदार अमरनाथ राजूरकर ,आ. बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री निलेश पावडे,  माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

 यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की,  नांदेडच्या वैभवात संजय बियाणी यांनी उभारलेल्या स्वर्गीय कांताबाई बालाप्रसादजी बियाणी पार्कने भर घातली आहे. माहेश्वरी समाजासाठी एकाच ठिकाणी वसाहत असावी ही संजय बियाणी यांची संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे टुमदार आणि चांगले घर असावे हे स्वप्न असते . सर्वसामान्य नागरिकांची हे स्वप्न संजय बियानी यांनी सत्यात उतरविले आहे.  त्यामुळे संजय बियाणी यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काढले .

अत्यंत अल्पदरात आणि शहरातील अत्यंत महत्त्वाच्या भागात स्वर्गीय कांताबाई बालाप्रसादजी बियाणी पार्कची झालेली उभारणी नांदेडच्या वैभवात भर घालतेच शिवाय सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करते. 73 कुटुंबांसाठी उभारलेल्या या पार्कमध्ये घरांच्या चाव्या संबंधित कुटुंबांना सुपूर्द करताना मला मनस्वी आनंद होत असल्याचेही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. माहेश्‍वरी समाजातील असलेले युवक संघटन आणि सामाजिक संघटन महत्त्वपूर्ण असून या समाजातील युवकांशी आणि संघटनांशी आपण स्वतंत्ररीत्या चर्चा करून त्यांच्या सामाजिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करु असा विश्वासही पालकमंत्र्यांनी दिला.

नांदेड शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत .शहराच्या विकासासाठी साडेआठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून स्वतंत्ररीत्या न्यायालयाची प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी कवठा परिसरात  जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या भागात न्यायालयाची स्वतंत्र इमारत उभी राहील असेही पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.साईबाबा कमान नवीन कौठा परिसरात सुवर्ण क्षणांचा साक्षीदार ठेवत संजय बियाणी डेव्हलपर्स ने उभारलेल्या महेश आवास योजनेतील 73 कुटुंबांना देण्यात आलेल्या घरांचा ताबा हा 73 कुटुंबांसाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता . माहेश्वरी समाजातील या कुटुंबासाठी आजच खरी दिवाळी आहे असेही पालकमंत्री म्हणाले.

दरम्यान माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या मनोगतात संजय बियाणी यांचा नांदेडचे नगरशेठ अशा शब्दात गौरवोद्गार काढले. शिवाय महेश्वरी समाज हा सामाजिक बांधिलकी जपणारा , माणुसकी धर्माचे तंतोतंत पालन करणारा समाज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नेहा शुभम चेचाणी – बियाणी यांचेही समयोचीत मनोगत झाले.

लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत महेश आवास योजनेचे संकल्पक तथा बिल्डर संजय बियाणी  यांच्यासह अनिता संजय बियाणी, प्रवीण बालाप्रसाद बियाणी ,पायल मयुर मंत्री,रविकुमार बालाप्रसाद बियाणी, नेहा शुभम चेचाणी, राज संजय बियाणी आणि बियाणी परिवाराच्या वतीने करण्यात आले.या सुरेख कार्यक्रमाच्या नियोजनात अनिकेत पुरुषोत्तम भक्कड,आश्विन ओमप्रकाश धूत,पुरुषोत्तम भक्कड ,चिरंजीलाल दागडीया, संपादक गोवर्धन बियाणी ,नांदेड जिल्हा महेश्वरी सभा आणि महेश्वरी समाजाच्या सर्व संघटनांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

या कार्यक्रमासाठी  नांदेड शहरातील अनेक मान्यवर,  महेश्वरी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, घराचे लाभधारक उपस्थित होते.आपल्या सदनिकांच्या चाव्या हाती पडल्यानंतर लाभार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले याची यावेळी दिसून आले तर अनेकांच्या चेहऱ्यावर ती समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत होते अनेक आणि बिल्डर तथा संकल्पक संजय बियाणी यांना धन्यवाद दिले.

महेश आवास योजनेचा देशातील पहिला मान नांदेडला स्वर्गीय कांताबाई बालाप्रसादजी बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बियाणी डेव्हलपरच्या वतीने देशभरात राबविण्यात येणार्‍या महेश आवास योजनेचा पहिला मान नांदेडकरांना मिळाला आहे. महेश आवास योजनेतून  माहेश्‍वरी समाजातील अत्यंत सर्वसामान्य कुटुंबियांना अल्पदरात  घर दिले जाते.