राज्यातील कोरोनाची स्थिती भयानक; मुख्यमंत्र्यांना स्थिती हाताळण्यात अपयश- भाजपा खा. नारायण राणे यांची टीका

मुंबई, १६ जुलै २०२०

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असल्याने त्यांचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, असे प्रतिपादन भाजपा खा. नारायण राणे यांनी गुरुवारी केले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खा. राणे म्हणाले की, कोरोनाची स्थिती हाताळताना कोणाचाच पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडतच नसल्याने त्यांना राज्यातील नेमकी स्थिती काय आहे, हे कळतच नाहीये. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नसल्याने स्थिती भयानक बनली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. मात्र या राज्यातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री घरात बसले आहेत, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून परिस्थितीची पाहणी करत आहेत. आरोग्य सेवकांना, पोलिसांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, रुग्णांच्या समस्या जाणून घेत आहेत.

यावेळी खा. राणे यांनी शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखतीबद्दलही भाष्य केले. कोरोनामुळे राज्यातील गंभीर बनलेल्या स्थितीबाबत पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन घेण्याऐवजी भूतकाळातील राजकीय घडामोडींबाबत मुलाखत घेऊन मुलाखतकारांनी आपल्याला राज्यातील स्थितीचे भान नाही हेच दाखवून दिले आहे. राज्यातील गंभीर स्थितीवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ही मुलाखत घेतली असावी, असेही खा. राणे म्हणाले. यावेळी त्यांनी सामना मधून शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेचे दाखलेही दिले. ज्या पवारांवर एवढी टीका केली त्याच पवारांची मॅरेथॉन मुलाखत सामनाला प्रसिद्ध करावी लागते आहे, यातच सारे आले, असे खा.राणे यांनी नमूद केले.

कोकणात चक्रीवादळ होऊन महिना उलटला तरी वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याबद्दल खा. राणे यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाबाबत शासनाची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगले वकील नेमण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी नगरसेवक अतुल शहा उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *