रोटेगाव ते मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण ; रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी

वैजापूर,२८ मार्च  /प्रतिनिधी :-मनमाड (अंकाई) ते रोटेगाव दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, सुरक्षा आणि गतीच्या दृष्टीने या लोहमार्गावर रेल्वे इंजिनची शनिवारी (ता.26) चाचणी घेण्यात आली. 

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे धोरण दुटप्पी असल्याने या भागात रेल्वे विकासाचा बोऱ्या वाजलेला आहे. सातत्याने मागणी करूनही रेल्वेचे अधिकारी त्याकडे हेतूतः दुर्लक्ष करतात. बऱ्याच संघर्षानंतर या भागात ब्रॉडगेज लाईन टाकण्यात आली. त्यानंतर मात्र आजपर्यंत मराठवाड्याच्या रेल्वेला काहीही मिळाले नाही. साधा डबा जोडण्यासाठी किंवा सोयीच्या वेळापत्रकासाठीही संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे. असे असतानाच केंद्र शासनाने संपूर्ण देशभर रेल्वे लाईन विद्युतीकरणाचा निर्णय घेतला त्यामुळेच या भागातील रेल्वे लाईनच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून सध्या अंकाई येथून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत परसोडा रेल्वे स्टेशनपर्यंत विद्युत खांब उभे राहिले आहेत. रोटेगांवपर्यंत वायरिंगचे काम पूर्ण झाले आहे.

विद्युतीकरण पूर्ण झालेल्या या मार्गावर शनिवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली इलेक्ट्रिक इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली. रोटेगांव रेल्वेस्थानकांवर कर्मचारी व नागरिकांनी रेल्वे इंजिनला हार घालून हिरवा कंदील दाखवला.रोटेगांव रेवस्थानकावर विद्युत टॉवर उभारण्यात आले आहे. यासाठी वैजापूर शहरातील बेलगांव रस्त्यावरील 132 केव्हीच्या विद्युत उपकेंद्रातून स्वतंत्रपणे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. रोटेगांव ते औरंगाबाद मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असून डिसेंबर अखेरपर्यंत हे  काम पूर्ण होईल अशी माहिती रोटेगांव रेल्वेस्टेशनचे व्यवस्थापक बी.जी.वाघ यांनी दिली.