वैजापूर येथे हॉटेलच्या नोकरांना गावठी कट्टा दाखवून धमकावले ; पिस्तूल व जिवंत काडतूससह तिघांना अटक

वैजापूर,२६ मार्च  /प्रतिनिधी :- नाश्त्याचे बिल मागितले म्हणून हॉटेलच्या नोकरांना गावठी कट्टा दाखवून धमकावणाऱ्या तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शहरालगतच्या वैजापूर – गंगापूर चौफुलीवर हॉटेल बाबामध्ये घडली. पकडलेल्या तिघांकडून गावठी कट्टा, 3 काडतुसे, चाकू, 3 मोबाईल व मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.  

Displaying IMG-20220326-WA0139.jpg

धनंजय अण्णासाहेब सोनवणे (वय 23 वर्षे, रा. संजरपूर, ता. गंगापूर), प्रदीप संजय खरात (वय 24 वर्षे, तांदूळवाडी, ता.गंगापूर) व शुभम शांताराम लांडगे (वय 24 वर्षे रा. वडगांव ता. संगमनेर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शस्त्रे मिळून आलेले तिघे रात्री बाबा हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी एकाने त्याच्याकडील कट्टा कामगारावर रोखल्याने एकच खळबळ उडाली. कामगारांनी क्षणाचाही विलंब न करता  तिघांना पकडून ठेवले. हा प्रकार समजताच पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, श्रीराम काळे, रज्जाक शेख, योगेश झाल्टे, अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व हॉटेलच्या नोकरांनी पकडलेल्या तिघांना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.