‘मॅजिक’ च्या कार्यालयाचे पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद,२६ मार्च /प्रतिनिधी :- मराठवाडा ॲक्सिलेरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कॉन्सिल (मॅजिक)च्या कार्यालयाचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज फीत कापून केले.

Image

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्या बजाज भवनात ‘मॅजिक’चे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई यांच्यासमवेत आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उद्योजक आशीष गर्दे, राम भोगले, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू आदींसह सीएमआयएचे पदाधिकारी, मॅजिकचे संचालक, स्टार्ट अप उद्योजक आदींची उपस्थिती होती.

Image

फीत कापल्यानंतर स्टार्ट अपबाबत नव तरूणांशी श्री. देसाई यांनी संवाद साधून त्यांच्या कल्पना, उद्योगाबाबत जाणून घेतले. उद्योग उभारणीबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले. नवनवीन कल्पना घेऊन तरुणांनी समोर यावे, सीएमआयएच्या माध्यमातून ‘मॅजिक’ उपलब्ध झाल्याने हीच खरी सेवा असल्याचेही श्री. देसाई यांनी कार्यक्रमात सांगितले. औरंगाबादेतील, सीएमआयएचे उद्योजक चाकोरीबाहेर जाऊन स्टार्ट अपसाठी मदत करतात, ही कौतुकाची आणि वंदनीय बाब आहे. नव तरुणांना वेगेवेगळ्या कल्पना सूचतात. त्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे काम औरंगाबादेतील उद्योजक करत आहेत. संबंधित स्टार्ट अपला आवश्यक ते सर्व सहकार्य, माहिती देण्याचे काम मॅजिकमधून करण्यात येत असल्याने श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गर्दे यांनी केले. आभार केदार देशपांडे यांनी मानले.