मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात कडाडले, भाजपचे काढले वाभाडे!

देवेंद्र फडणवीस तुम्हाला ‘रॉ’मध्ये घेतले पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,२५ मार्च  /प्रतिनिधी :-पहाटेचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर, तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही. आम्ही तुमच्या गळ्यात पट्टा बांधवला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नीच विकृत आणि निंदनीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर ये, बघतो तू आहे आणि मी आहे. आता कळत नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण. याला मर्दपणा म्हणत नाही. घराघरातील कुटुंबाला बदनाम करायचा. धाडी टाकायच्या. मागे गडकरी म्हणाले आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्युमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का. म्हैसूर साबण लावायचा बघा झाला स्वच्छ, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत भाजपवर कडाडून हल्ला चढवला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. तुम्ही जे करत आहात ते सत्तेसाठी चालले आहे.  हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच कुटुंबीयांची बदनामी करू नका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले. त्याचवेळी सारखे आरोप करुन ते खरं वाटायला लागलात टोला लगावत  ‘देवेंद्र फडणवीस तुम्हाला ‘रॉ’मध्ये घेतले पाहिजे म्हणजे काम वेगान होईल, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

बाळासाहेबांना काय उत्तर देणार. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं ते तरी काय उत्तर देणार. देशात सर्व सांगत होते हे नको हे नको. तेव्हा बाळासाहेब म्हणाले हे रादू द्या काय उत्तर देणार. 2006 साली मी हिंदू होतो, आजही आहे. तुरुंगात टाकणार असाल तर मी सर्वांची जबाबदारी घेतो, माझ्या शिवसैनिकांचीही घेतो, टाका मला तुरुंगात. ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली त्यांचा छळ कशासाठी ? असा सवालीही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 

सुधीर मुनगंटीवार तुम्ही  हे शासन हे बेवड्याचे आहे का, महाराष्ट्राला तुम्ही मद्यराष्ट्र म्हणाला. पण, वाईन हे मोठ्याला शॉपिंग मॉलमध्ये मिळणार आहे. तुम्ही चंद्रपूरमधून आला आहात. तुमच्या बाजूला मध्यप्रदेश आहे. संबंध नसला तरी आपला तो बाब्या आणि दुसरा तो असं नाही करायचं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वाईन विक्रीच्या मुद्यावरून भाजपला टोला लगावला.फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याची प्रगती विरोधकांना दिसत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील आकडेवारीचा संदर्भ देत राज्यात सर्वांत कमी मद्याची दुकाने असल्याचा दावा त्यांनी केला.

;देशात १ लाख लोकांच्या संख्येमागे महाराष्ट्रात मद्य विक्रीची दुकानं सर्वात कमी आहे. कर्नाटकमध्ये ७.१० मध्यप्रदेश, ५.०७ आणि उत्तर प्रदेश २.६० तेलंगणा ७.३० इतके प्रमाण आहे. त्यामुळे लगेच राज्याची बदनामी करायचे नाही. राज्यपालांना तुम्ही बोलू देत नाही, महाराष्ट्राला बदनाम करता योग्य नाही, अशी आकडेवारीच सभागृहात वाचून दाखवली.

‘रावणाचा जीव हा बेंबीमध्ये आहे. त्यामुळे केंद्रात सरकार मिळाले तरी मुंबईमध्ये जीव आहे. मुंबईमध्ये जीव असू शकतो हे मी समजू शकतो. मी पक्क मुंबईकर आहे. माझ्या राज्याचा आणि देशाचा अभिमान आहे, तसा शहराचा अभिमान आहे’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

मुख्यमंत्र्यांचा टोला

अधिवेशनात जे काही झालं त्यावर मी आज मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जे बोलणार आहे ते तळमळीने बोलणार हे. मला खोटं बोलता येत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात केली तर मला एका गोष्टीचं खरंच दु:ख आहे, खेद आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आमच्यापेक्षा विरोधीपक्षांना जास्त माहिती आहे. तो त्यांचा अधिकारही आहे. वेळोवेळी तक्रार करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे केवळ विरोधीपक्षच नाही तर राज्यातील कुणीही नागरिक जाऊ शकतो. पण दुर्दैवाने या सर्व गोष्टी आपण जशा पाळतो, अधिकार मानतो तशा काही प्रथा, परंपरा आपण पाळल्या पाहिजेत. ठिक आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. पण निदान आपल्या राज्याची एक संस्कृती आहे, प्रथा आहे, परंपरा आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाला सुरुवात करताच जो काही गोंधळ सुरू झाला तो आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. निदान राज्यपाल महोदय काय बोलत आहेत ते तरी ऐकायला पाहिजे होतं.

तेव्हा तुम्ही एक उल्लेख केला, दाऊदचा उल्लेख… तो उल्लेख तेवढ्यापूरता नव्हता तर नंतर संपूर्ण आठवडा आणि जवळपास महिनाभर आपलं अधिवेशन आहे, तो उल्लेख आपण रोजच करत आला आहात. म्हणजे देवेंद्रजी काल पाण कविता बोलून दाखवली तेच ते आणि तेच ते… ते महिनाभर केलंत तुम्ही. दाऊद एके दाऊद आणि दाऊद एक दाऊद, दाऊद दुणे कोण?… हा भाग वेगळा, पण हे तुम्ही केलंत. मला अशी एक अपेक्षा होती की, ज्यावेळी हक्काने आपण राज्य सरकारबाबत काही तक्रारी राज्यपालांकडे नोंदवत असतो तेव्हा निदान आपलं सरकार आपल्या राज्याचं सरकार काय करत आहे याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्यापर्यंत मांडत असतात. राज्यपालांचं भाषण तर ऐकलंच नाही, राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत. म्हणजे इतका मोठा घोर अपमान आजपर्यंत देशभरात कुठल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत जागतिक दर्जाची विकासकामे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईचा मला अभिमान आहे. मी सच्चा मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईतील विकास कामे जागतिक दर्जाची असतील याकडे शासन कटाक्षाने लक्ष देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोविड कालावधीत राज्य शासनाने वैद्यकीय संसाधने, ऑक्सीजनची कमी असतांना हजारो किलोमीटर वरून रिकामे टँकर पाठवून, एअर लिफ्ट करून ऑक्सीजन आणला. यासाठी रात्रंदिवस आपली यंत्रणा कार्यरत होती, मुख्यमंत्री म्हणून मला या यंत्रणेचा अभिमान आहे.

स्कॉटलँण्ड येथील वातावरणीय बदल परिषदेत महाराष्ट्राने प्रादेशिक पुरस्कार जिंकला. कोविड काळात 5 रुपयात आणि नंतर मोफत जेवण दिले. गोरगरीबांचे पोट यातून भरले आजपर्यंत 8 कोटी थाळ्यांचे वितरण आपण शिवभोजन योजनेत केले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आपण 500 कोटी रुपये दिले आहेत. हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी  महामार्गाचे 70 टक्के काम झाले आहे.  सागरी किनारी मार्गाचे 50 टक्के काम झाले आहे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

मुंबईसारखं शहर नाही. मला मुंबईचा अभिमान आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत आपल्या पाल्‍यांना प्रवेश मिळावा म्हणून रांग लागते. आठ भाषेतून शिक्षण देणारी मुंबई  एकमेव पालिका आहे. विद्यार्थ्यांना टॅब देत आहोत. 15 हजार शौचालयांचे काम केले आहे. 500 चौ. फुटाच्या घराला मालमत्ता करातून पूर्ण सवलत दिली आहे. निवडक दवाखान्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना सुरु केली. काही चाचण्या मोफत तर काही माफक दरात करत आहोत, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईने कोविड काळात जे काम केले ते मुंबई मॉडेल म्हणून जगभरात प्रसिद्ध झालं. फिल्ड हॉस्पीटल, जम्बो हॉस्पीटल उभारले.

सफाई कामगारांच्या घराचा विषय असेल तो शासनाने मार्गी लावला आहे. 2 तारखेला मराठी भाषा भवनाचे भूमीपुजन अतिशय दिमाखाने करत आहोत. बीडीडी चाळीचा प्रश्न मार्गी लावला आहे. डबेवाला भवनाला जागा दिली आहे. वरळी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभे करत आहोत. मुंबईत मेट्रो रेल्वे ची कामे सुरु आहेत. मात्र मेट्रो प्रकल्पाच्या किंमतीत वाढ कशी झाली याची चौकशी केली जाईल. सौर उर्जा प्रकल्प उभे करत आहोत. पर्यावरणाच्यादृष्टीने इलेक्ट्रिक बसेस आणतो आहोत. पर्यावरणाची हानी होऊ न देता शाश्वत विकासाला शासनाचे प्राधान्य आहे, असे श्री. ठाकरे म्हणाले.

धारावीचा पुनर्विकास रखडला आहे. त्यासाठी रेल्वेची 40 एकर जागा केंद्र सरकारकडून हस्तांतरीत होण्याची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे आहे. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी पंचसुत्रीच्या आधारे जीवनावश्यक गोष्टीला केंद्रीभूत ठेऊन अर्थसंकल्प मांडला. कठीण काळात जे करता येणार आहे त्यावर अप्रतिम अर्थसंकल्प त्यांनी तयार केला आणि मांडला. या अर्थसंकल्पातील सर्व बाबींची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली.

या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र वायकर, अमित साटम, अबु आजमी, अतुल भातखळकर, प्रशांत ठाकुर, रईस शेख, कालीदास कोळंबकर, श्रीमती मनिषा चौधरी आदी सहभाग घेतला होता.