देवस्थान इनाम जमिनीबाबतचा प्रश्न सोडविणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई,२४ मार्च  /प्रतिनिधी :- देवस्थान इनाम जमिनीबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन निर्णय लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सरोज आहिरे यांनी नाशिक जिल्ह्यातील विहीतगाव, मनोली, बेलतगव्हाण, तिरडशेत या गावातील देवस्थान इनाम जमिनीबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानसभा सदस्य ॲड. आशिष शेलार, योगेश सागर यांनी भाग घेतला. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.थोरात म्हणाले, गुजरात सरकारने देवस्थान इनाम जमिनीबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक नवीन कायदा आणला आहे. राज्य शासन याचा देखील अभ्यास करून राज्यात हा कायदा कशा प्रकारे आणता येईल तसेच मा. उच्च न्यायालयाचे निष्कर्ष व यापूर्वी वेळोवेळी विधी न्यायालयाने देवस्थान जमिनीच्या संदर्भात दिलेले निष्कर्ष देखील विचारात घेऊन याचा अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीक जमिनीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊ – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई :- श्रीरामपूर तालुक्यातील आकारी जमिनीसंदर्भात मूळ शेतकऱ्यांना या जमिनी पुन्हा मिळाव्यात यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्रीराम तालुक्यातील आकारी पडीत जमिनींबाबत लक्षवेधी  उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील  एकूण ७३७७ एकर इतकी जमीन तत्कालीन १९१८ मध्ये इंग्रज सरकारने संपादीत केली होती. एकूण त्या कालावधीतील वस्तुस्थिती तसेच तत्कालीन १९१८ मधील अधिसूचना, १९२० मध्ये कंपनी आणि ब्रिटीश सरकार यांच्यातील करार, भूसंपादन कायद्यातील तरतुदी,वेळोवेळी झालेले न्यायालयीन निर्णय या सर्व बाबींच्या संदर्भात पुन्हा एकदा राज्याच्या महाधिवक्ता यांच्याकडून अभिप्राय घेवून मुळ शेतकऱ्यांना ही जमिन वाटप करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती महसूल मंत्री श्री. थोरात यांनी विधानसभेत दिली.

पुणे शहरात प्रस्तावित अंतर्गत- बाह्य रिंगरोडसाठी अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटींची तरतूद – नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई, दि. 24 : पुणे शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य रिंगरोड प्रस्तावित असून या अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटी तरतूद केली आहे. या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून भूसंपादनाचे बरेचसे टप्पे पार पडले आहेत, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. राहुल कुल, जयकुमार गोरे आदी सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच शहरांच्या बाहेरील ग्रोथ सेंटर्ससह एकूण २१७२ चौ. कि.मी. क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा अहवाल तयार करण्यात आला आहे. याच सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसरच भविष्यातील  सर्व वाहतूक योजनांची कामे करण्यात येणार आहे. पुण्याकडे जाताना शिक्रापूरपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या रहदारीचा विचार करुन फ्लायओव्हर घेण्यात येणार असून त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम सुरु आहे, ते तातडीने करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

शहरातून विमानतळाकडे जाणाऱ्यांना रिंगरोडची चांगली मदत होणार असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्वावर करण्यात येणार असून महिनाभरात निविदेचे काम होईल, असे सांगून पुणे-सिंहगड मार्गावरील पूलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.