शाळा सुरक्षा कायद्यासंदर्भात लवकरच बैठक – शंभुराज देसाई

मुंबई, २४ मार्च  /प्रतिनिधी :- शाळा सुरक्षा कायद्यासंदर्भात शिक्षण क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील समिती स्थापन करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने घेण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी औरंगाबाद जिल्हयातील कन्नड शहरातील मकरणपूर भागातील एका शाळेतील मुलींची छेड काढून गैरवर्तन केल्याप्रकरणाची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती. यास उत्तर देताना श्री. देसाई बोलत होते. घटना घडल्यानंतर आरोपींना दुस-याच दिवशी अटक करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींवर दोनपेक्षा जास्त गुन्हे असल्यास तडीपारीची कारवाई करता येईल का हे तपासण्यात येईल, तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी शाळा सुरु होताना व शाळा सुटतेवेळी पोलिस गस्त घालण्यात येत असल्याचे श्री. देसाई म्हणाले,

महिला सुरक्षेला शासन सर्वोच्च प्राधान्य देते. सातारा जिल्हयात सुरु असलेला महिला सुरक्षा पथदर्शी हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री. देसाई म्हणाले

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी  भाग घेतला