मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पित्यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

वैजापूर न्यायालयाचा निकाल
वैजापूर,२४ मार्च  /प्रतिनिधी :-अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वडीलास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेचे आदेश न्यायालयाने दिले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. मोहीयोद्दीन एम. ए.यांनी हा निकाल दिला. गौतम गोविंद बोर्डे (39, रा. विनायक नगर साखर कारखाना, बोरसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

घटनेतील आरोपी हा कुटुंबासोबत विनायकनगर साखर कारखाना, बोरसर येथे राहतो. 12 जुलै 2020 रोजी गुन्ह्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी पिडीत मुलगी ही आपल्या आई व बहिणीसोबत घरात झोपली होती. त्यावेळी आरोपी हा घरात आला व त्याने घरातील लाईट बंद करत मुलीच्या अंगावरील पांघरुण ओढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पिडिताला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून पिडीत मुलगी लासुरस्टेशनला मामाकडे आली. यापुर्वीही आरोपी हा मुलीला कॉलेजला जाऊ नको, माझ्यासोबत चल असे वाईट हेतुने म्हणत पाठीवरुन हात  फिरवत विनयभंग केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदारांचा जवाब नोंदवण्यात आला. यात पिडीत मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. अपराध सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एम मोहियोदीन एम. ए. यांनी आरोपीला दोषी ठरवत विनयभंगाच्या आरोपाखाली पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेविरुद्व अश्लिल भाषा वापरुन असभ्य वर्तन केल्याच्या आरोपाखाली आणखी तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. त्यांना वैजापूर पोलिस स्टेशनचे पैरवी अधिकारी जाधव यांनी सहकार्य केले.