औरंगाबाद येथे ११ एकर जागेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित शाळा सुरू करण्यात येणार

सामाजिक न्याय विभागाच्या योजना नाविन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल करून राबवत गरजूंना लाभ देण्याचे नियोजन – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई,२३ मार्च  /प्रतिनिधी :-सामाजिक न्याय विभाग राज्यातील वंचित, उपेक्षित घटकांच्या विकासाशी थेट जोडलेला असून या विभागातील योजना सर्वसामान्य गरजूंना लाभदायक आहेत. या सर्व योजनांचा बारकाईने अभ्यास करून, नावीन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल करून या योजनांचा लाभ खऱ्या गरजूपर्यंत पोहोचावा असे नियोजन सामाजिक न्याय विभागाने केले असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत बोलताना केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विविध योजना, विधानसभा सदस्यांच्या त्यानुरूप असलेल्या मागण्या यासंबंधी विधानसभा सभागृहात आयोजित अनुदान मागण्यांवरील चर्चेला मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामास गती देण्यात आली असून, स्वाधार शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती आदी योजनांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. यासाठी कुठेही निधीची अडचण भासणार नाही, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

औरंगाबाद येथे सामाजिक न्याय विभागाच्या ११ एकर जागेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक पंचतारांकित शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

यावेळी धनंजय मुंडे यांनी दिव्यांग, ऊसतोड कामगार, तृतीयपंथीयांसह विविध लाभार्थी समाज घटकांसाठी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजना व खर्च केलेल्या निधीची माहिती सभागृहाला दिली. तसेच सभागृहातील चर्चेदरम्यान सदस्य आमदारांनी केलेल्या विविध मागण्यांचाही सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी माहिती दिली.