महावितरणच्‍या सहायक अभियंत्‍यासह कर्मचाऱ्याना धक्काबुकी करुन महिला कर्मचाऱ्याचा विनभयंग:तिघा आरोपींना सक्तमजुरी

औरंगाबाद ,२२ मार्च /प्रतिनिधी :-वीजेची चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्‍यासाठी गेलेल्या महावितरणच्‍या सहायक अभियंत्‍यासह कर्मचाऱ्याना धक्काबुकी करुन महिला कर्मचाऱ्याचा विनभयंग केल्याप्रकरणी आरोपी मकसुद खान मकबुल खान पठाण (३८), मोहसीन खान मकबुल खान पठाण (२५) आणि हरीभाऊ पंढरीनाथ राजगुरु (३३, सर्व रा. आसेगाव ता. गंगापुर) या तिघांना एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.आर. जगदाळे यांनी ठोठावली.

प्रकरणात महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत बाळासाहेब गोरे यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, ६ ऑगस्‍ट २०१८ रोजी फिर्यादी हे पथकासह वीज चोरी करणार्यांवर कारवाई करण्‍यासाठी आसेगाव परिसरात गेले होते. दरम्यान आरोपी मकसुद खान याच्‍या घराच्‍यातील वीजेची तपासणी केली असता तो वीज चोरी करित असल्याचे समोर आले. त्‍यामुळे त्‍याच्‍या घराचे वीज कनेक्श्‍न कट करण्‍यात आले. चिडलेल्या आरोपीने फिर्यादी कॉलर पकडून ध‍क्काबुक्की करुन मारहाण केली. पथकातील कर्मचार्यांना देखील आरोपींनी धक्काबुक्की करून धमकावले. तसेच पथकातील एका महिलेची ओढणी ओढून तिला ढकलून दिले. प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता मनिषा गंडले यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३५३ अन्वये तिघा आरोपींना एक वर्षे सक्तमजुरी आणि भादंवी कलम ३२३ अन्‍वये एका महिन्‍याचा साध्‍या कारावसाची शिक्षा ठोठावली.