वीज उद्योगाच्या खाजगीकरणाविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी कामगार महासंघ रस्त्यावर

औरंगाबाद ,२२ मार्च /प्रतिनिधी :- वीज क्षेत्राचे खाजगीकरण करू नये तसेच कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने मंगळवारी (२२ मार्च) घेतलेल्या द्वारसभेत वीज कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाच्या परिसरात झालेल्या द्वारसभेत संघटनेचे महामंत्री श्रीअरुण पिवळ म्हणाले की, एकीकडे वीज उद्योगाच्या खाजगीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे ह्या परिस्थितीचा लाभ घेत तिन्ही विद्युत कंपन्यांचे व्यवस्थापन कामगारांच्या जिव्हाळ्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. विद्युत कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये यासाठी वीज कामगार प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून थकबाकी वसूल करीत आहेत तर दुसरीकडे आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी ऊर्जामंत्री वीज कामगार करीत असलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. मीडियामध्ये जाणूनबुजून कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापण्यात येणार असल्याचे सूतोवाच करणे व १६ शहरातील वीज वितरण खाजगी कंपन्याकडे देण्यात येणार असल्याची वार्ता पेरणे असे उद्योग सुरू आहेत. एकीकडे केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाला राज्य सरकारचा विरोध असल्याचा आव आणायचा व दुसरीकडे दुप्पट वेगाने खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करायची. जलविद्युत प्रकल्प भाडेतत्वाची मुदत संपल्यावर देखभालीसाठी खाजगी कंपन्याकडे सोपवण्याबाबत शासकीय निर्णयावरून दिसून येते. या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी व नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे शासनाने व व्यवस्थापनाने स्पष्ट करावे या मागणीसाठी कामगार महासंघ आज रस्त्यावर आहे, असे श्री.अरुण पिवळ (महामंत्री, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ) यांनी सभेस संबोधित करताना सांगितले.
कोणत्याही राजकीय उद्दिष्टांसाठी हे आंदोलन नाही. कारण आपल्या पक्षांच्या राजकीय स्वार्थासाठी कामगारांना व जनतेला वेठीस धरणे भारतीय मजदूर संघास मान्य नाही. जोपर्यंत महाराष्ट्र शासन अधिकृतपणे खाजगीकरण करत असल्याची घोषणा करीत नाही तोपर्यंत निव्वळ मीडियातील बातम्यांना आधार मानून संपासारखे अंतिम शस्त्र हाती घेणे भारतीय मजदूर संघास मान्य नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका अधिकृतरित्या स्पष्ट करावी, अशी आमची मागणी आहे.

शासनाने आपली भूमिका स्पष्ट केल्यावर कामगार महासंघ आपली पुढील रणनीती ठरवेल. वरील धोरणात्मक विषयांसोबतच कामगारांच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय तिन्ही कंपन्यामध्ये दुर्लक्षित आहेत. काही विषय असे आहेत की, ज्यात प्रत्येक कंपनीचा वेगळा नियम आहे. मृत कामगारांच्या वारसास नोकरी देण्यात अक्षम्य विलंब होत आहे. नोकरी मिळेपर्यंत वारसांना दिला जाणारा निर्वाह भत्ता अतिशय तुटपुंजा आहे व तो ही ठराविक वयानंतर बंद केला जातो. लाईन स्टाफ/जनमित्र यांचेवर अनेक कामे लादली जात आहेत. ज्यादा कामाचा मोबदलासुद्धा दिला जात नाही. उलट वसुली कमी झाली तर कारवाई केली जाते. महावितरणमध्ये  जेष्ठ यंत्रचालक पदाची निर्मिती करावी, ही खूप जुनी मागणी अद्यापही प्रलंबित आहे. तिन्ही कंपन्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत व दरमहा त्यात भर पडत आहे. एकीकडे कामाचा बोजा वाढत आहे तर दुसरीकडे रिक्त जागा वाढत आहेत.

आमची अशी मागणी आहे की, रिक्त जागा ह्या प्रथम पदोन्नतीने भराव्यात. नंतर कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे व उर्वरित जागा सरळ भरतीद्वारे भरण्यात याव्यात. बदली धोरण समान असावे व त्यात पक्षपात होऊ नये. सौर ऊर्जा प्रकल्प महानिर्मितीद्वारे चालविण्यात यावेत . एम.ओ.डी. स्पर्धेत टिकण्यासाठी उत्तम प्रतीचा कोळसा खरेदी केला जावा व अन्य अनावश्यक खर्च टाळला जावा. महापारेषण कंपनीत अभियांत्रिकी पदविका प्राप्त कामगारांना कनिष्ठ अभियंता होण्याची संधी उपलब्ध करून दिली जावी. सर्वेक्षण श्रेणी १ व २ ला पूर्वीप्रमाणे पदोन्नती दिली जावी. तांत्रिक कामगार आकृतीबंध फायनल करताना कामगार महासंघास जे आश्वासन दिले होते, त्यानुसार ऑपरेटिंग स्टाफ व लाईन स्टाफला शक्यतो कामात बदल होणार नाही, अशा ठिकाणीच पोस्टिंग दिले जावी. या व अशा अन्य अनेक मागण्याकडे शासन व व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने व्यवस्थापनाला नोटीस दिली होती. परंतु व्यवस्थापनाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने २२ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, सर्व सर्कल, झोन व पॉवर स्टेशनसमोर प्रचंड निषेध सभांचे आयोजन करून शासनाला व व्यवस्थापनाला कामगारांमध्ये असलेल्या असंतोषाची जाणीव करून दिली व ह्या असंतोषाची जर वेळीच दखल घेतली नाही तर मात्र तीव्र आंदोलन केले जाईल, हा इशारा देखील देण्यात आला.

आज औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या द्वारसभेस श्री.अरुण पिवळ (महामंत्री), श्री. बापू शिंदे (कार्यालयीन मंत्री, महावितरण), श्री.तुषार भोसले (प्रादेशिक अध्यक्ष), श्री. दादाराव वाघमोडे  (औरंगाबाद परिमंडळ अध्यक्ष), श्री. वाल्मीक निकम (औरंगाबाद परिमंडळ सचिव), श्री.प्रेमसिंग डोबाल (औरंगाबाद परिमंडळ उपाध्यक्ष), श्री.अण्णा ताठे (औरंगाबाद परिमंडळ उपाध्यक्ष), श्री. धनंजय वझुरकर (औरंगाबाद परिमंडळ संघटनमंत्री) यांच्यसह मोठ्या संख्येने पूर्ण औरंगाबाद परिमंडलातील गंगापूर उपविभाग, पैठण उपविभाग, वैजापूर उपविभाग, ग्रामीण उपविभाग-१ व २, कन्नड, पिशोर, फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद येथील विविध स्तरावरील महावितरण कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.