‘स्वारातीम’ विद्यापीठाला राज्याबाहेर संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनाची परवानगी

नांदेड ,२२ मार्च  /प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राज्याबाहेर संशोधन केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. हैदराबाद येथील अनु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय व INCOIS (Indian National Center for Ocean Information Services) या दोन संस्थेसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार तिथे संशोधन केंद्र उभे करायचे आहे. याचा उपयोग नजीकच्या काळात अध्ययन, अध्यापन तसेच संशोधनाचा कक्षा रुंदावण्यासाठी होणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ अनेक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. इतर मोठ्या शहरातील विद्यापीठाच्या तुलनेत ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संशोधन सामुग्रीची उपलब्धता कामी आहे. याचे कारण संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या भव्य अशा प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे, संशोधन माहिती इत्यादी. या अडचणी कुलगुरू महोदयांनी लक्षात घेतल्या आणि तसा रीतसर परवाणगीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता. आणि सदर प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे.

भविष्यातील संशोधकांची कौशल्यपूर्वक रोजगार संधीची गरज ओळखून कुलगुरू महोदयांच्या पुढाकाराने हैदराबाद येथील अनु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय आणि INCOIS ( Indian National Center for Ocean Information Services) या दोन भारतीय संस्थेशी सामंजस्य करार केलेला होता. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच राज्याबाहेरील शासकीय दोन प्रयोगशाळेचे निर्माण होणार आहे. या संशोधन केंद्रामुळे विद्यापीठांतर्गत प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांना दोन्ही संस्थेमध्ये राहून काम करता येईल. संशोधन सामुग्रीचा, प्रयोगशाळेचा आणि तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन तथा सहभाग मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना त्या संस्थेतील नॉलेज रिसर्च सेंटरचा उपयोग होऊन उच्च दर्जाचे संशोधन करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी वर्ग तथा संकुलाचे संचालक यांच्या प्रयत्नातून विद्यापीठाच्या संशोधनातील कक्षा रुंदावण्यासाठी मदत होणार आहे. या संशोधन केंद्राचा संशोधक विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले आहे.