जागतिक युवा कौशल्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

pm narendra modi to address on the occasion of World Youth Skills ...

नवी दिल्ली, 15 जुलै 2020

नमस्कार

नमस्कार, माझ्या युवा सहकाऱ्यांनो,

जागतिक युवा कौशल्य दिनाच्या तुम्हा सर्व तरुणांना माझ्या खूप खूप शुभेच्छा

आजचा हा दिवस तुमच्या अंगी असलेले स्किल, तुमच्या कौशल्याला समर्पित आहे. 21 व्या शतकातील युवकांचे, आजच्या या शतकातील युवकांचे सर्वात मोठे जर कोणते सामर्थ्य असेल तर ते आहे त्यांचे कौशल्य आणि कौशल्य आत्मसात करण्याची त्यांची क्षमता.

मित्रांनो,

कोरोनाच्या या संकटाने जागतिक संस्कृतीमध्ये बदल करण्याबरोबरच कामाच्या स्वरुपातही बदल घडवले आहेत आणि सातत्याने बदलत राहणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाने देखील त्याच्यावर आपला प्रभाव निर्माण केला आहे. नवी कार्य- संस्कृती आणि कामाच्या बदलणाऱे स्वरुप लक्षात घेऊन आपले युवक अतिशय जलदगतीने नव- नवी कौशल्ये आत्मसात करत आहेत.

तसे पाहायला गेले तर मित्रांनो, मला अनेक लोक विचारत असतात, सध्याच्या काळात व्यवसाय आणि बाजारपेठा इतक्या झपाट्याने बदलत आहेत की त्यांच्याशी सुसंगत कसे राहायचे, ताळमेळ कसा साधायचा हेच समजत नाही. कोरोनाच्या काळात तर हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा झाला आहे.

मित्रांनो,

या प्रश्नाचे मी एकच उत्तर देतो, सुसंगत राहण्याचा एकच मूलमंत्र आहे आणि  तो आहे कौशल्य, रि- स्किल म्हणजे नवी कौशल्ये आत्मसात करणे आणि अप स्किल म्हणजे त्यात सुधारणा करत राहणे. कौशल्याचा अर्थ आहे तुम्ही काही तरी नवे कसब आत्मसात करणे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही एका लाकडाच्या ओंडक्यापासून खुर्ची बनवायला शिकलात तर ते तुमचे कसब झाले. तुम्ही त्या लाकडाच्या ओंडक्याचे मूल्य देखील वाढवले. मूल्य वर्धन केले. मात्र, या खुर्चीची किंमत टिकून राहावी म्हणून तुम्हाला नव्या रचना, नवी शैली म्हणजेच रोज काही तरी नवनवीन करावे लागते आणि त्यासाठी सतत काही तरी नवीन शिकत राहावे लागते. नवीन काही तरी शिकत राहायचे म्हणजेच नव्याने कौशल्य निर्मिती आणि आपले जे कौशल्य आहे, त्याचा विस्तार करत राहायचे म्हणजे लहान मोठ्या लाकडाच्या वस्तू बनवता बनवता तुम्ही आणखी काही तरी शिकत जाता, संपूर्ण कार्यालयाची रचना करू लागता तर त्याला म्हणतात अप स्किल म्हणजे कौशल्यात सुधारणा. स्किल, रि- स्किल आणि अप स्किल चा हा मूलमंत्र जाणून घेणे आणि त्याचे पालन करणे  आपल्या सर्वांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे.

तसे पाहाता जेव्हा मी कौशल्यासंदर्भात बोलतो तेव्हा मला स्वतःला फार वर्षांपूर्वी माझ्या ओळखीचे झालेल्या एका व्यक्तीची नेहमी आठवण येते. तशी माझी त्यांच्याशी थेट ओळख नव्हती. पण माझ्या ओळखीचे एक सदगृहस्थ मला सांगत असायचे. त्यांच्या माहितीच्या विषयाबद्दल ते सांगत राहायचे. ते फार जास्त शिकलेले नव्हते. पण त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. काळानुरूप त्यांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये आणखी नवनवीन शैलींची भर घातली. म्हणजेच त्यांनी स्वतःला रि-स्किल केले. त्यांचे हे कसब पाहून लोक स्वतःहून त्यांच्याकडे जाऊ लागले. लोक त्यांना सांगत राहायचे आमच्याकडे काही विशेष कार्यक्रम, समारंभ असेल तर निमंत्रण पत्रिकेचे वगैरे काम तुम्ही करा. नंतर त्यांनी स्वतःला रि-स्किल केले, अप स्किल केले. त्यांनी अनेक भाषांमध्ये लेखन करायला सुरुवात केली, आणखी काही भाषा शिकून घेतल्या आणि अशा प्रकारे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार वाढत गेला. बसल्या बसल्या लोक त्यांच्याकडे काम घेऊन येऊ लागले. केवळ छंद म्हणून जोपासलेली एक कला त्यांच्या चरितार्थाचे आणि त्यांच्या सन्मानाचे माध्यम बनली.

मित्रांनो,

कौशल्य म्हणजे आपण आपल्या स्वतःला देत असलेली एक देणगी आहे, जिच्यामध्ये अनुभवाने वाढ होत जाते. कौशल्य कालातीत आहे, काळानुरूप ते अधिकाधिक वाढत जाते. कौशल्य अद्वितीय आहे, ते तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. कौशल्य हा एक असा खजिना आहे जो कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही आणि कौशल्य म्हणजे आत्मनिर्भरता आहे. कौशल्य तुम्हाला केवळ रोजगारक्षमच बनवत नाही तर स्वयंरोजगारक्षम देखील बनवते. कौशल्य  म्हणजे एक असे सामर्थ्य आहे, जे मानवाला कुठल्या कुठे पोहोचवू शकते.

मित्रांनो,

आपल्या कौशल्यात वाढ करण्याची एकही संधी न सोडणे ही यशस्वी व्यक्तीची सर्वात मोठी खूण असते. केवळ इतकेच नाही, संधी शोधत राहा. जर तुम्हाला कौशल्याचे आकर्षण नसेल, काही नवीन शिकण्याची लालसा नसेल तर जीवन जागच्या जागी थांबून जाते. एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो. एका प्रकारे ती व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वासाठी ओझे बनू लागते. आणि केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या कुटुंबियांसाठी देखील ती ओझे बनून जाते. दुसरीकडे कौशल्याच्या आकर्षणामुळे जगण्याचे सामर्थ्य मिळते, जीवनात उत्साह निर्माण  होतो. कौशल्य म्हणजे केवळ आपल्या उदरनिर्वाहाचे आणि पैसे कमवायचे माध्यम नाही. जीवनात उमेद हवी, उत्साह हवा, जीवन जगण्याची जिद्द पाहिजे. अशा वेळी कौशल्य आपल्या जीवनाला चालना देणारे बळ बनते. आपल्यासाठी एक नवी प्रेरणा बनते. उर्जा देणारे माध्यम बनते आणि मग वय कोणतेही असो, तारुण्य असो किंवा ज्येष्ठ नागरिक असोत, जर तुम्ही नव नवी कौशल्ये आत्मसात करत राहिलात तर जीवनाविषयीचा तुमचा उत्साह कधीच कमी होणार नाही.

मित्रांनो,

कौशल्याचे सामर्थ्य काय असते याची प्रचिती देणारा अनुभव प्रत्येकालाच कधी ना कधी आलेला असेल. मी जेव्हा तुमच्याशी बोलत आहे त्यावेळी आज मला देखील फार पूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण होत आहे. ही घटना त्या काळातील आहे ज्यावेळी मी माझ्या तरुणपणी एका आदिवासी पट्ट्यात स्वयंसेवक म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी काही सामाजिक संस्थासोबत मी काम करत राहायचो. तर एकदा एका संस्थेबरोबर काम करत असताना त्यांच्या सदस्यांसोबत मला कुठे तरी बाहेर जायचे होते. तर मग त्यांच्या जीपमधून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघणार होतो. पण ज्यावेळी सकाळी सकाळी त्या जीपने जाण्यासाठी निघालो नेमकी त्याच वेळी ती जीप सुरूच झाली नाही. मग सर्व लोक कामाला लागले, त्यांनी जीप सुरू करण्याचे बरेच प्रयत्न केले. जीपला धक्का मारून पाहिला, आणखी इतर काही प्रयत्न केले. पण जीप काही सुरू झाली नाही. आता जेव्हा सात- आठ वाजून गेले त्यावेळी एका मेकॅनिकला पाचारण करण्यात आले. त्याने त्या जीपमध्ये काही तरी इकडे तिकडे केले आणि दोन मिनिटात ती जीप दुरुस्त झाली. त्याला विचारले किती पैसे झाले तर तो म्हणाला वीस रुपये. त्या काळात वीस रुपये म्हणजे खूपच जास्त होते. आमच्या एका सहकाऱ्याने त्याला म्हटले की अरे मित्रा, केवळ दोन मिनिटाचे हे काम होते आणि त्याचे तू वीस रुपये मागतोस. त्यावर त्या मेकॅनिकने जे उत्तर दिले ते उत्तर मला आजही प्रेरणा देते. माझ्या मनावर प्रभाव निर्माण करते. त्या अशिक्षित मेकॅनिकने सांगितले की साहेब मी दोन मिनिटांचे वीस रुपये मागत नाही आहे. वीस वर्षे काम करून करून माझ्यामध्ये जे कौशल्य निर्माण झाले आहे, जो अनुभव मला आहे त्याचे हे वीस रुपये आहेत. याला म्हणतात कौशल्याचे सामर्थ्य. कौशल्य तुमच्या कामालाच नाही तर तुमच्यातील प्रतिभेला, तुमच्या प्रभावाला प्रेरक बनवते.

आणि मित्रांनो,

या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे काही लोक ज्ञान आणि कौशल्य याबाबत नेहमीच संभ्रमावस्थेत असतात किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांचे मी नेहमीच एक लहानसे उदाहरण देतो. सायकल कशी चालवायची याची माहिती तुम्हाला पुस्तकात मिळू शकते, तुम्हाला यू ट्युबवर व्हिडिओ मध्ये याची माहिती मिळू शकते. सायकलवर कसे बसायचे असते, सायकल कशी असते, कोणता भाग कोणते काम करतो. हँडल कुठे पकडायचे, ब्रेक कसा लावायचा, हे सर्व त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल. हे सर्व ज्ञान आहे. पण तुम्हाला ज्ञान आहे म्हणून तुम्हाला सायकल चालवता येईलच याची हमी देता येणार नाही. प्रत्यक्षात खरोखर सायकल चालवायची जेव्हा वेळ येते तेव्हा कौशल्याची गरज असते. तुम्हाला हळू हळू सायकल चालवायला येऊ लागते आणि एकदा का तुम्हाला सायकल जमू लागली की तुम्ही अगदी मजेत सायकल चालवू लागता. जस जशी ही कला तुम्ही आत्मसात करता, गुणवत्ता प्राप्त करता, त्यानंतर तुम्हाला सायकल कशी चालवायची यासाठी फार डोके वापरावे लागत नाही.

आणि हाच फरक सरकारपासून समाजाच्या प्रत्येक स्तरावर समजून घेणे अतिशय गरजेचे असते. आज भारतात ज्ञान आणि कौशल्य यात जो फरक आहे तो लक्षात घेऊनच काम केले जात आहे. पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी याच विचाराने स्किल इंडिया मिशन सुरू करण्यात आले होते. युवकांनी ज्ञानाबरोबरच कौशल्य देखील आत्मसात करावे हाच यामागे उद्देश होता. यासाठी देशभरात प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली. आयटीआयची संख्या वाढवण्यात आली. त्यामध्ये लाखो जागांची भर घालण्यात आली. याच काळात पाच कोटींपेक्षा जास्त लोकांचा कौशल्य विकास करण्यात आला आहे आणि ही मोहीम निरंतर सुरू आहे.

मित्रांनो,

झपाट्याने बदलणाऱ्या आजच्या या जगात अनेक क्षेत्रांमध्ये लाखो कौशल्यप्राप्त लोकांची गरज आहे. विशेषतः आरोग्य सेवांमध्ये तर खूप जास्त प्रमाणात संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. हेच लक्षात घेऊन आता कौशल्य विकास मंत्रालयाने जगभरात निर्माण होत असलेल्या या संधींचा शोध घेऊन त्याचा आराखडा(मॅपिंग) तयार करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील युवकांना इतर देशांच्या गरजांविषयी, त्यांच्या संदर्भात योग्य आणि अचूक माहिती उपलब्ध व्हावी हाच प्रयत्न आहे. कोणत्या देशात आरोग्य सेवांमध्ये नवी दालने खुली होत आहेत, कोणत्या देशात कोणत्या सेवा क्षेत्रात, कोणत्या प्रकारची मागणी निर्माण होत आहे. याच्याशी संबंधित माहिती आता भारतातील युवकांना जलद गतीने मिळू शकणार आहे.

आता जर मर्चंट नेव्हीचे उदाहरण घेतले तर भारतासह संपूर्ण जगात खलाशांची मोठी गरज आहे. आपल्याकडे तर साडेसात हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची किनारपट्टी आहे. सागराची आणि किनारपट्टीच्या स्थितीची चांगली माहिती असणाऱ्या तरुणांची संख्या देशात लक्षणीय आहे. आता या क्षेत्रांमध्ये कौशल्याचा विकास करण्यावर भर देण्यात आला तर  जगभरातील अनेक देशांना आपण लाखो कुशल खलाशी उपलब्ध करू शकतो आणि आपल्या देशाची किनारी अर्थव्यवस्था देखील मजबूत करू शकतो.

मॅपिंग करण्यामुळे आता अशा प्रकारची माहिती देण्याचे काम आता आणखी सोपे होईल. त्याशिवाय चार-पाच दिवसांपूर्वी देशातील श्रमिकांच्या कौशल्याचे मॅपिंग करणाऱे एक पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल कौशल्यप्राप्त लोकांचे, कौशल्यप्राप्त श्रमिकांचे मॅपिंग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

यामुळे नियोक्ता केवळ एका क्लिकद्वारे कौशल्यप्राप्त कामगारांपर्यंत पोहोचू शकतात, विशेषतः जे कामगार सध्या आपापल्या गावांमध्ये परतले आहेत, त्यांना यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकते. तुम्ही आता मधल्या काळात पाहिले असेल की एका विशेष प्रकारच्या कौशल्याच्या संचासह गावांमध्ये परतलेल्या लोकांनी गावांचा कायापालट करायला सुरुवात केली आहे. कोणी शाळांची रंगरंगोटी करत आहेत तर कोणी नव्या रचनांची घरे बनवत आहेत. लहान- मोठे असे प्रत्येक प्रकारचे कौशल्यच आत्मनिर्भर भारताचे एक खूप मोठे सामर्थ्य बनणार आहे.

मी देशातील युवकांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देत आहे. आणि जागतिक महामाराची काळ असताना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहण्याचे माझे कर्तव्य आहे आणि केवळ मीच याचा पुनरुच्चार करून चालणार नाही. तर तुम्ही देखील याचा पुनरुच्चार करत राहिले पाहिजे. काय आहे ते? सर्वात आधी मी म्हणेन की तुम्ही सर्वांनी निरोगी राहा. दुसरी गोष्ट म्हणजे दो गज की दुरी म्हणजेच कमीत कमी सहा फूट अंतर राखण्याचे पालन केले पाहिजे, मास्कचा वापर करायला विसरू नका, थुंकण्याची सवय सोडून देण्यासाठी सर्वांना समजावत राहा आणि ज्या कामासाठी आज या ठिकाणी जमलो आहोत, तो मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवा. मग तुम्ही कितीही शिकलेले असाल, कितीही पदव्या मिळवलेल्या असतील, तरीही सतत आपल्या कौशल्यात सुधारणा करत राहिले पाहिजे, सातत्याने नव्या कौशल्यासाठी स्वतःला सज्ज ठेवले पाहिजे. जीवन जगण्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. जीवनातील नव्या संधी प्राप्त केल्याचा आनंद तुम्हाला मिळेल आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या हातांच्या सामर्थ्याने, तुमच्या बोटांच्या सामर्थ्याने, तुमच्या हृदयाच्या आणि मेंदूच्या सामर्थ्याने एका कौशल्याच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध कराल आणि विकास कराल आणि स्वतःच्या प्रगतीसोबत देशाचीही प्रगती कराल.

खूप खूप आभार

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *