महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, दि. 21 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. सायरस पुनावाला आणि एन.चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिंमतराव बावस्कर तसेच डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. श्री. पुनावाला हे सुप्रसिद्ध औषधी निर्माता आहेत. जगातील सर्वात मोठी औषधी निर्माण करणारी सिरम संस्थेचे ते संस्थापक आहेत. कोरोना माहामारीच्या साथीत या संस्थेने तयार केलेली लस सर्व भारतीयांना तसेच अन्य देशातील लोकांनाही सर्वोपयोगी ठरली. त्यांच्या या कार्याची दखल घेत आज त्यांना सन्मानित करण्यात आले.

श्री एन. चंद्रशेखरन यांनाही उद्योग व व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. श्री चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. ते भारतील एक नामांकित उद्योजक आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांना गौरविण्यात आले.

4 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार’ प्रदान

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. भिमसेन सिंघल यांना ‘पद्मश्री पुरस्कारा’ने  सन्मानित करण्यात आले. डॉ. सिंघल हे नामांकित न्यूरोलॉजिस्ट आहेत. डॉ. सिंघल यांनी मज्जतंतूचा शास्त्रीयरीत्या अभ्यास केलेला आहे. धमन्या आक्रसणे (स्क्लेरोसिस) आणि पार्किन्सन रोगावर त्यांचे संशोधन जगमान्य आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करीत त्यांना आजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. विजयकुमार डोंगरे यांना कुष्ठरोगांवर केलल्या निस्वार्थ उपचारांसाठी वैद्यकीय क्षेत्रामधून ‘पद्मश्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. डॉ. डोंगरे हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते गेली अनेक वर्ष कुष्ठरोग्यांवर उपचार करीत आहेत. त्यांच्या या निरपेक्ष सेवेची दखल घेऊन त्यांना आज गौरविण्यात आले.

विंचुदंश आणि सर्पदंशावर केलेल्या अभ्यासासाठी डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन आज सन्मानित करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विंचुदंश आणि सर्पदंश झालेल्यांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत. त्यांच्या या  कामाची दखल घेत आज त्यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ.राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आज त्यांना सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यावर्षी एकूण १२८ पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे.

पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. १० अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापैकी आज काही पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात 28 मार्च रोजी प्रदान करण्यात येतील.