देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय व ‘पीजीएपीएल’ यांच्यात सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराच्या संधी

औरंगाबाद ,२१ मार्च /प्रतिनिधी :- देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय व औरंगाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील नामांकित असलेल्या पवना गोयल ऑटो प्रा.लि. यांच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी रविवारी सामंजस्य करार करण्यात आला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरटिचणीस आ.सतीश चव्हाण व पवना गोयल ऑटो प्रा.लि. ग्रुपचे कार्यकारी संचालक पंकज फुलफगर यांनी या शैक्षणिक करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

May be an image of 4 people, people sitting and people standing
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय व ‘पीजीएपीएल’ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी आ.सतीश चव्हाण, पंकज फुलफगर, शेख सलीम, डॉ.उल्हास शिऊरकर आदी.

     देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयर्चीं झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, सदस्य विश्वास येळीकर, राजेश मोरे, महाविद्यालयाचे संचालक डॉ.उल्हास शिऊरकर, पवना गोयल ऑटो प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश फुलफगर, एलक्राफ्ट हेल्थ अँड न्युट्रिशन प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक अक्षय चव्हाण, अमित अग्रवाल,उद्योजक सुनील किर्दक, प्रसाद कोकीळ, संदीप पाठक, अमर माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पवना गोयल ऑटो प्रा.लि. ही कंपनी अॅल्युमिनियम डाय कास्ट उत्पादन तयार करते. या कंपनीतून तयार होणारे डाय कास्ट उत्पादन बजाज ऑटो, कावासाकी इंडिया, आयएफबी या सार‘या नामांकित कंपन्यामध्ये वापरले जातात. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, प्रोजेक्ट इंटरशिप आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

याप्रसंगी बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, अभियांत्रिकीचे शिक्षण हे केवळ वर्गात बसून किंवा पुस्तकी अभ्यास करून पूर्ण होत नाही तर प्रत्यक्ष काम करण्याची संधी जर विद्यार्थ्यांना मिळाली तर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्णत्वाकडे जावू शकते. या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असतानाच औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असल्याने त्याचा नक्कीच फायदा होईल. तर पंकज फुलफगर म्हणाले की, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय व याठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमची कंपनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेईल तसेच महाविद्यालयातून जास्तीत जास्त उद्योजक घडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविद्यालयाचे संचालक डॉ.उल्हास शिऊरकर यांनी, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता त्यांना रोजगाराच्या संधी कशा निर्माण करून देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीले आहे. आज महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देशासह विदेशात देखील मोठ्या पदावर कार्यरत आहेत. आजच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आपले भविष्य घडू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.