वैजापूर तालुक्यात खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे 22 मार्चपासून पंचायत समिती गणनिहाय शिवसंपर्क अभियान

वैजापूर,२१ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यभरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी तसेच राज्यात गेल्या  अडीच वर्षात शिवसेनेने केलेल्या व करत असलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे जनसंपर्क अभियान मंगळवारपासून (ता.22) वैजापूर तालुक्यात सुरू होणार आहे. शिवसेना सचीव तथा खासदार विनायक राऊत  हे पंचायत समिती गणनिहाय संपर्क साधणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी दिली.

या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान सुरू होणार आहे. तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय ही शिवसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असून, मंगळवारी (ता.22)- वाकला, पोखरी, शिऊर, खंडाळा, बोरसर व मणूर बुधवारी (ता.23)- लासुरगांव, शिवराई, सवंदगांव,आघुर व घायगांव गुरुवारी(ता.24)- महालगांव, नागमठाण,विरगांव, वांजरगांव व लाडगांव तर शुक्रवारी (ता.25)-वैजापूर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या गंगापूर तालुक्यातील नेवरगांव, वाहेगांव, सिध्दनाथ- वाडगांव व घोडेगांव येथे खा.विनायक राऊत हे संपर्क साधणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे हे या अभियानाचे संयोजक आहेत. तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यानी या शिवसंपर्क अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी व शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांनी केले आहे.