रेल्वे प्रवासी सेनेच्या नेटवर्कमुळे वैजापूरच्या “त्या” बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश

वैजापूर,२१ मार्च  /प्रतिनिधी :-घरातील मंडळींनी शिक्षणासाठी असमर्थता दर्शविल्याने घरातून फरार झालेल्या वैजापूर तालुक्यातील तीन अल्पवयीन मुलींची मानवी तस्करी करण्याचा प्रयत्न रेल्वे सेनेच्या नेटवर्कमुळे व परळी पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे फसला. सदरील तिन्हीही मुली पोलिसांनी रेल्वेतून ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या सुपूर्द केल्या आहेत. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी एकास ताब्यात घेतल्याचे समजते.

वैजापूर शहरातील दोन व ग्रामीण भागातील नगिनापिंपळगाव येथील एक अशा तिघीही अल्पवयीन मुली येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या तिघींमध्येही घनिष्ठ मैत्री असल्यामुळे त्यांचा रोज प्रत्यक्ष अथवा समाज माध्यमांतून  एकमेकींशी संपर्क होता. विशेष म्हणजे या तिघींच्याही घरातील मंडळींची त्यांना उच्च शिक्षण देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे घरातील मंडळी आपले शिक्षण अर्धवट थांबवून लग्न उरकून टाकतील अशी भीती त्यांना होती. त्यामुळे स्वबळावर काहीतरी मेहनत करून उभे राहावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे यातील तालुक्यातील नगिनापिंपळगाव येथील मुलीने 17 मार्च रोजी काही एक न सांगता घर सोडले.या प्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्पूर्वी शहरातील त्या दोघी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे नातेवाईकांकडे राहण्यास गेल्या होत्या. दरम्यान नगिनापिंपळगाव येथील मुलीचा शोध घेण्यासाठी वैजापूर पोलिस ठाण्याचे फौजदार विकास ढोकरे व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक गठित करून तिचा शोध सुरू केला.दरम्यान रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमाणी यांना पोलिसांकडून याबाबत माहिती मिळाली व मदतीचे आवाहन करण्यात आले त्यावरून सोमाणी यांनी रेल्वेशी संबंधित आपले नेटवर्क कामाला लावले.
लोकेशन ट्रॅकिंगनुसार “त्या” मुलीचे लोकेशन नांदेड येत होते. दरम्यान त्या तिघीही मुलींनी एकमेकींशी संपर्क साधून नांदेड येथे भेटण्याचे ठरविले. त्यांनी रेल्वेने प्रवास सुरू केला. पोलिसांनी घेतलेल्या लोकेशन, रेल्वे प्रवासी संघटना व स्थानिक पोलिसांच्या माहितीआधारे त्या तिघीही नांदेड – पनवेल एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे नांदेड पोलिस व रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोष सोमाणी व त्यांच्या चमूने ही माहिती परळी ( बीड ) पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी पुढची फिल्डींग लावली. परळी पोलिसांनी रेल्वे पोलिस दलासह रेल्वे प्रशासनास ही माहिती देऊन पुढील ऑपरेशन सुरू केले. नांदेडहून आलेली रेल्वे  परळी रेल्वेस्थानकात थांबवून बोगीमध्ये शोध घेतला असता त्या तिघीही मिळून आल्या. पोलिसांनी त्या तिघींनाही त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.

दरम्यान तालुक्यातील नगिनापिंपळगाव येथील मुलगी घरातून गायब झाल्यानंतर तिच्या बॅगमध्ये सीम सापडले. तसेच ती तिच्या मोबाईलवरून मैत्रिणीशी संशयास्पद बोलली असल्याचे तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले. पोलीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा डाव हाणून पाडण्यात आला.

असा आला प्रकार उघडकीस

नांदेड पोलिसांनी त्या मुलींना ताब्यात घेतल्यानंतर यातील दोघींना विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर आम्हाला आमिष दाखवून फूस लावून पळविण्याचा हा डाव होता असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मानवी तस्करी करण्याचा हा डाव होता. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.  परंतु सर्वांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसल्याचे संतोष सोमाणी यांनी सांगितले. मानवी तस्करीचा संशय असल्यामुळे नांदेड पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून पोलिस त्या दिशेनेही तपास करीत आहेत. 

विकास ढोकरे, फौजदार, वैजापूर

 परळी येथे रेल्वेमध्ये सापडलेल्या तिन्हीही मुली वैजापूर तालुक्यातील असून मैत्रिणी आहेत. घरातील सदस्यांनी शिक्षणासाठी असमर्थता दर्शविल्याने त्या तिघींनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वैजापूर पोलिस ठाण्यात एकाच मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. परळी, नांदेड व रेल्वे पोलिसांमुळे मुलींना शोधण्यात यश आले.