टेंभापूरी प्रकल्पाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच बैठक घेणार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची विधान परिषदेत माहिती

लक्षवेधीव्दारे आ.सतीश चव्हाण यांनी वेधले सभागृहाचे लक्ष

Tembhapuri Dam | Landmark & Historical Place | -NA-

औरंगाबाद,२१ मार्च  /प्रतिनिधी :- गंगापूर तालुक्यातील टेंभापूरी मध्यम प्रकल्पाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच या प्रकल्पातील धरणग्रस्तांना पर्यायी जमीन, धरणग‘स्त प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासंदर्भात दोन महिन्यात योग्य ती कार्यवाही केली जाईल असे राज्याचे जलंसपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. आ.सतीश चव्हाण यांनी टेंभापूरी मध्यम प्रकल्पासंदर्भात आज  विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

     टेंभापूरी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजना करण्यास्तव शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास 6 जानेवारी 2021 रोजी कार्यवाही करण्यास सूचित केले होते. मात्र यावर अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पावर आसपासच्या 25 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे कायगाव येथून गोदावरीतील बॅक वाटरमधून पाणी लिफ्ट करून टेंभापूरी प्रकल्पात आणल्यास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून पिण्याचा पाण्याबरोबर याठिकाणी सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे जायकवाडी पाणी वापर फेर नियोजनामध्ये टेंभापूरी प्रकल्पास एक टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, या प्रकल्पातील धरणग्रस्तांना पर्यायी जमीन, रहिवाशी प्लॉट, धरणग‘स्त प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे अशा आग्रही मागण्या आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सभागृहात केल्या.

     आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेंभापूरी प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे सभागृहात सांगितले. तसेच या प्रकल्पातील धरणग्रस्तांना पर्यायी जमीन, धरणग्रस्त प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासंदर्भात दोन महिन्यात योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सभागृहास आश्वस्त केले.