मराठवाड्याला जास्तीत जास्त पाणी मिळावे यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द -जलसंपदामंत्री जयंत पाटील

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून वैजापूर तालुक्यातील शनिदेवगांव बॅरेजच्या कामाला गती

वैजापूर,१८ मार्च  /प्रतिनिधी :-मराठवाड्याला जास्तीत जास्त पाणी मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असून माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून वैजापूर तालुक्यातील शनिदेवगांव बॅरेजच्या कामाला गती देण्यात येईल व यामुळे 2 हजार 800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

Displaying FB_IMG_1647535346082.jpg

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित या एकसष्टी कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयसिंगराव गायकवाड, आ.सतीश चव्हाण, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख, प्रदीप सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील  म्हणाले की, वैजापूर तालुक्याचे भूमिपुत्र स्व.विनायकराव अण्णांशी माझ्या वडीलांचे घनिष्ठ संबंध होते.भाऊसाहेब पाटील आमदार असताना विधिमंडळात त्यांनी अतिशय संयमाने काम केले.वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांनी लोकप्रबोधनाचेही काम अगदी मनापासून केले असे सांगून वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून शनी देवगांव बॅरेजच्या कामाला गती देण्याची घोषणा त्यांनी केली.राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून या सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. मात्र न डगमगता आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहू.
या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष अकील सेठ, प्रतापराव निंबाळकर, प्रशांत शिंदे, प्रेमसिंग राजपूत, राजेंद्र मगर, मंजाहरी गाढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.