अग्रसेन फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

डॉ.रामलाल अग्रवाल यांची माहिती 

जालना,१७ मार्च /प्रतिनिधी :-जालना येथील महाराजा अग्रसेन फाउंडेशन तर्फे गतवर्षीप्रमाणे यंदाही व्यावसायिक अथवा तांत्रिक उच्च शिक्षण घेणाऱ्या जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गुणवंत अशा दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून तज्ञ समितीमार्फत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. अशी माहिती महाराजा अग्रसेन फाउंडेशनचे प्रमुख तथा जे.ई. एस. महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल यांनी गुरुवारी दिली. 

अधिक माहिती देताना डॉ. रामलाल अग्रवाल यांनी सांगितले की, महागडे व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षण घेताना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने फाउंडेशन मार्फत  अडीच लाख रुपये दहा विद्यार्थ्यांना विभागून  शिष्यवृत्ती स्वरूपात दिले जातात.या साठी  उद्योजक राजेंद्र बारवाले, बनारसीदास जिंदल, मधुसुदन बगडिया यांचे सहकार्य लाभत असल्याचे डॉ. रामलाल अग्रवाल यांनी नमूद केले. एम. बी .बी .एस.अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी आदी शासनमान्य महाविद्यालयात प्रवेश घेतलेले तसेच कुठलीही शासकीय किंवा अशासकीय शिष्यवृत्ती न घेणारे विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात .असे सांगून जात ,धर्म, लिंग असे कुठलेच बंधन नसून विद्यार्थ्यांनी 25 मार्च 2022 पर्यंत महाराजा अग्रसेन फाउंडेशन जे. ई. एस. महाविद्यालया समोर येथे उपलब्ध असलेले अर्ज सादर करावेत .शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉ. शिवाजी मदन , प्रा. संदीप पाटील, डॉ.प्रतिभा श्रीपत यांच्या समितीमार्फत योग्य निकषांवर निवड केली जाणार असून निवड प्रक्रियेबाबत उमेदवारांना कळविले जाईल असे डॉ.रामलाल अग्रवाल यांनी सांगितले.